लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : वस्त्रोद्योगातील समस्या, सूत व्यापाऱ्यांची चुकीची कार्यपद्धती, ५ टक्के व्याज अनुदान, कर्जमाफी, वीज सवलत, आदी अडचणींसंदर्भात नागपूर येथे झालेल्या वस्त्रोद्योग क्षेत्रातील बैठकीत उपाययोजनांबाबत चर्चा करून या समस्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी समिती नेमावी, यासाठीची शिफारस सरकारकडे करणार असल्याचे वस्त्रोद्योग आयुक्त डॉ. माधवी खोडे-चवरे यांनी सांगितले, अशी माहिती पॉवरलूम असोसिएशनच्यावतीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली. विविध कारणांमुळे गेल्या काही वर्षांपासून वस्त्रोद्योग व्यवसाय अडचणीत सापडला आहे. त्यात सुधारणा होऊन संजीवनी मिळण्यासाठी यंत्रमाग संघटनांच्यावतीने शासनाकडे वारंवार मागणी सुरू होती. त्यानुसार वस्त्रोद्योग आयुक्त डॉ. खोडे-चवरे यांच्या अध्यक्षतेखाली नागपुरात बुधवारी बैठक झाली. त्यामध्ये १५ लाख रुपयेपर्यंतची थकीत कर्जे माफ व्हावीत. भांडवली अनुदान पूर्वीप्रमाणे द्यावे. वीज बिलातील सवलत लागू करावी. मल्टीपार्टी वीज जोडणीतील जाचक अट रद्द करावी. कामगारांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करून त्यातून सर्व सवलती व सुविधा द्याव्यात. त्यांच्यासाठी घरकुल योजना राबवावी. सूत दरवाढ, काऊंट, वजन यामध्ये तफावत, सुताच्या बिलात फेरफार, सावकारकी पद्धतीने व्याज आकारणे, या समस्यांबाबत सविस्तर माहिती आयुक्तांना देण्यात आली. त्यावर चर्चा करून सुतासंदर्भात समिती नेमणे. त्यामध्ये प्रादेशिक उपायुक्त, वजन मापन अधिकारी, दुकान निरीक्षक, नगरपालिकेचे अधिकारी, पॉवरलूम असोसिएशनचे एक प्रतिनिधी अशा पाच लोकांचा समावेश असेल. वस्त्रोद्योग क्षेत्रातील प्रत्येक विभागात याप्रमाणे समिती नेमली जाईल, असे ठरविण्यात आले. त्याचबरोबर याबाबत सरकारकडे शिफारस करणार असल्याचे सांगितले.
बैठकीस मुंबई प्रादेशिक उपायुक्त तांबे, औरंगाबदचे प्रादेशिक उपायुक्त स्वामी, सोलापूरचे चंद्रकांत टिकोले, नागपूरचे नितीन भोसले, वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी, इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनचे अध्यक्ष सतीश कोष्टी, चंद्रकांत पाटील, रफिक खानापुरे, आदींसह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
फोटो ओळी ०३०२२०२१-आयसीएच-०६
नागपुरात वस्त्रोद्योगातील समस्यांसंदर्भात वस्त्रोद्योग आयुक्त डॉ. माधवी खोडे-चवरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी मुंबई प्रादेशिक उपायुक्त तांबे, औरंगाबदचे प्रादेशिक उपायुक्त स्वामी, सोलापूरचे चंद्रकांत टिकोले, नागपूरचे नितीन भोसले, वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी, इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनचे अध्यक्ष सतीश कोष्टी उपस्थित होते.