हिरण्यकेशी नदीत बुडून मामा भाचे यांचा मृत्यू; सासऱ्याचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रमातून येत असतानाच घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2026 12:39 IST2026-05-12T12:37:41+5:302026-05-12T12:39:57+5:30
रविवारी हिरलगे येथे अरुण बंडू सुतार यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम होता. कार्यक्रमानंतर मामा सुनील व भाचा प्रवीण हे हिरलगे येथेच राहिले.

हिरण्यकेशी नदीत बुडून मामा भाचे यांचा मृत्यू; सासऱ्याचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रमातून येत असतानाच घटना
सदाशिव मोरे
आजरा : कोवाडे ( ता.आजरा ) येथील हिरण्यकेशी नदीत बुडून मामा सुनील विष्णू सुतार ( वय ५५ रा. कोवाडे ) व त्यांचा भाचा प्रवीण पांडुरंग सुतार ( वय ३५ रा. वाळकी कर्नाटक ) या दोघांचा मृत्यू झाला आहे. प्रवीण यांच्या सासऱ्याच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाहून कोवाडे येथे येत असताना सोमवारी दुपारी ही घटना घडली आहे.
रविवारी हिरलगे येथे अरुण बंडू सुतार यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम होता. कार्यक्रमानंतर मामा सुनील व भाचा प्रवीण हे हिरलगे येथेच राहिले. व सोमवारी दुपारी दोन नंतर कोवाडे येथे मोटर सायकलने येत होते. हिरण्यकेशी नदीवरील हिरलगे - कोवाडे दरम्यान अर्धवट स्थितीत बांधकाम असलेल्या बंधाऱ्याच्याकडेला मोटरसायकल लावून नदीतून येत होते. मामा सुनील यांचा शेवाळलेल्या दगडावरून पाय घसरल्याने ते पाण्यात पडले. त्यांना वाचविण्यासाठी गेलेले प्रवीण यांना पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही पाण्यात बुडाले.
सोमवारी रात्री दोघेही कोवाडे येथे घरी न आल्याने शोधाशोध सुरू झाली. रात्री बंधाऱ्याच्या काठाला मोटरसायकल आढळून आली. आज सकाळी बंधाऱ्याशेजारी सुनील यांचा मृतदेह आढळला तर प्रवीण यांचा मृतदेह पाण्यातून काढण्यात आला आहे. दोघेही सुतार काम करत होते. मृत्यूची माहिती हिरलगे व कोवाडे येथे समजताच सर्वत्र शोककळा पसरली आहे.