उसाची वाहतूक बनतेय मृत्यूचा सापळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:26 IST2021-02-09T04:26:53+5:302021-02-09T04:26:53+5:30

सरदार चौगुले, पोर्ले तर्फ ठाणे : रस्त्याला कडेला उसाने भरलेल्या ट्राॅलीला धडकून जिल्ह्यात ठिकठिकाणी अपघात होत आहेत. काही ठिकाणी ...

Sugarcane transport becomes a death trap | उसाची वाहतूक बनतेय मृत्यूचा सापळा

उसाची वाहतूक बनतेय मृत्यूचा सापळा

सरदार चौगुले,

पोर्ले तर्फ ठाणे : रस्त्याला कडेला उसाने भरलेल्या ट्राॅलीला धडकून जिल्ह्यात ठिकठिकाणी अपघात होत आहेत. काही ठिकाणी दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला; तर काहीजण जायबंद झाले आहेत. तरीही रस्त्याच्या कडेला वाहन लावण्याचा खटाटोप काही कमी होत नाही.

रस्ते वाहतूक सुरक्षा नियमांचे उल्लंघन करीत बेजबाबदारपणे रस्त्याच्या कडेला वाहनतळ बनविणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई का होत नाही, असा सवाल नागरिकांतून होत आहे.

बैलगाड्यांची संख्या कमी झाल्याने साखर कारखान्यास ट्रक, ट्रॅक्टर-ट्राॅलीने, कार्टिंग वाहनांनी ऊस वाहतूक केली जात आहे. उसाने भरलेले वाहन उसाच्या फडातून बाहेर काढले की थेट कारखान्यात टोकन नंबर काढून ऊस उतण्याची प्रतीक्षा करीत वाहनअड्ड्यात लावले जाते. नंबर कधी येईल याचा नेम नसल्यामुळे आणि रात्री-अपरात्री रस्त्यावर वर्दळ कमी असल्यामुळे वाहनचालक उसाने भरलेले वाहन मुख्य रस्त्याच्या कडेला लावून कारखान्याकडे जातात.

साखर कारखाने रस्ते सुरक्षा उपक्रमांतर्गत ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना रिफ्लेक्टर पट्टी किंवा रिफ्लेक्टर असलेले कापड लावण्याची मोहीम राबवतात. शिवाय प्रबोधन करीत असतात. रिफ्लेक्टर लावलेल्या पट्ट्या उसाने झाकल्या जातात. सुरक्षेचा भाग म्हणून वाहनाच्या मागे बांधलेले कापड लावलेच जात नाही. त्यामुळे समोरच्या वाहनांना पास देण्यासाठी वेगवान असणारी दुचाकी किंवा वाहन उसाने भरलेल्या वाहनावर धडकते. या अपघातात अनेकांचा जीव गेला आहे; तर काहीजण जायबंद झाले आहेत. रस्ता सुरक्षेचे सर्व नियम धाब्यावर बसवून लाखमोलाच्या जीवास कारणीभूत ठरणाऱ्या आणि मुख्य रस्त्याला वाहनतळ बनविणाऱ्या वाहनधारकांवर कडक कारवाई झाली तरच नाहक जाणाऱ्या बळींची संख्या कमी होईल.

रिफ्लेकटर नसलेल्या वाहनांवर कारवाई

हंगामाच्या सुरुवातीलाच प्रत्येक कारखान्याने ऊसवाहतूक करणाऱ्या वाहनांना रिफ्लेक्टर नाही तर ऊसअड्ड्यात प्रवेश नाही, असा कडक नियम करायला पाहिजे. तसेच वाहतूक यंत्रणेने आणि पोलिसांनी रिफ्लेक्टर नसलेल्या वाहनांवर कायदेशीर कारवाई केली पाहिजे. ती जुजबी नसावी. तसेच रस्त्याच्या कडेला वाहन लावून मार्गात अडथळा निर्माण करणाऱ्या सर्वच प्रकारच्या वाहनांवर कारवाईची मोहीम राबविली पाहिजे.

.........

वादाचे प्रकार

कारखान्यावर लवकर नंबर मिळावा या उद्देशाने ऊसवाहतूक करणाऱ्या वाहनांची रस्त्यावर स्पर्धा सुरू असते. जागा मिळेल तेथे वाहनांना पास करताना उसाची वाहने झोले खात उलटली आहेत. यामध्ये उलटलेल्या उसाखाली सापडून अनेकांचा जीव गेला आहे. ट्रॅक्टर-ट्राॅलीवाले टेपरेकाॅर्डर लावून मागील वाहनांना पास देत नाहीत. यातून वादाचे अनेक प्रकार घडले आहेत.

Web Title: Sugarcane transport becomes a death trap