यड्रावकरांच्या निधीचा विषय समाजकल्याण समितीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:28 IST2021-09-23T04:28:36+5:302021-09-23T04:28:36+5:30

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण समितीच्या बुधवारी झालेल्या सभेमध्ये आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांना देण्यात आलेल्या निधीचा मुद्दा ...

The subject of Yadravkar's fund is in the Social Welfare Committee | यड्रावकरांच्या निधीचा विषय समाजकल्याण समितीत

यड्रावकरांच्या निधीचा विषय समाजकल्याण समितीत

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण समितीच्या बुधवारी झालेल्या सभेमध्ये आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांना देण्यात आलेल्या निधीचा मुद्दा चर्चेत आला. यावेळी दहा कोटींहून अधिक दलितवस्ती निधीच्या कामांना मंजुरी देण्यात आली.

वाठार येथील अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट येथे दुपारी सभापती कोमल मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली. दलितवस्तीच्या निधीपैकी सव्वा कोटींचा निधी यड्रावकर यांना दिला आहे. हा विषय कुणी काढला आणि बातम्या कशा आल्या, असा सवाल यावेळी राष्ट्रवादीच्या सदस्या परवीन पटेल यांनी उपस्थित केला. यावेळी सर्वांनीच काही माहिती नाही, अशी भूमिका घेतली. सदस्य सुभाष सातपुते यांनी यावेळी ज्या प्रमाणे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री सतेज पाटील यांनी सदस्यांना निधी उपलब्ध करून दिला, तसाच निधी यड्रावकर यांनीही उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केली. स्वाती सासने यांनी सर्व सदस्यांसह जाऊन आपण निधीची मागणी करावी, अशी सूचना केली.

यावेळी आचारसंहिता व नंतर होणारी जिल्हा परिषद निवडणूक याचा विचार करून दलितवस्तीतील ज्या कामांचा प्रस्ताव आला आहे त्यांना मंजुरी देण्याचा निर्णय घेण्यात आला. जसजशी कामे येतील तशी मंजुरी द्यावी, अशीही सूचना करण्यात आली. तसेच १४ ऑक्टोंबरपर्यंत वैयक्तिक लाभाच्या योजनांच्या प्रस्तावांना मुदतवाढ देण्याचाही निर्णय झाला.

बैठकीला विशांत महापुरे, मनीषा माने, विजय खोत, सविता चौगुले, महेश चौगुले, अशोकराव माने उपस्थित होते. जिल्हा समाजकल्याण अधिकारी दीपक घाटे यांनी योजनांचा आढावा घेतला.

Web Title: The subject of Yadravkar's fund is in the Social Welfare Committee