Kolhapur: विद्यार्थ्याने होस्टेलच्या बाथरूममध्ये गळफास घेत जीवन संपवले, नातेवाइकांचा आरोप; जमावाकडून अकॅडमीची तोडफोड
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 12:29 IST2025-06-18T12:29:20+5:302025-06-18T12:29:38+5:30
नातेवाइकांनी सखोल तपासाची मागणी केली

Kolhapur: विद्यार्थ्याने होस्टेलच्या बाथरूममध्ये गळफास घेत जीवन संपवले, नातेवाइकांचा आरोप; जमावाकडून अकॅडमीची तोडफोड
इचलकरंजी : बारावीत शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थ्याने सुतार मळा येथील भंडारी होस्टेलच्या बाथरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. यश अजित यादव (वय १७, रा. पलूस, जि. सांगली) असे त्याचे नाव आहे. ही घटना मंगळवारी सकाळी घडली. या घटनेनंतर नातेवाइकांनी यश याच्या मृत्यूबद्दल संशय व्यक्त करत सखोल तपासाची मागणी केली. दरम्यान, तरुणांच्या संतप्त जमावाने श्रद्धा अकॅडमीवर हल्ला चढवला. दगडफेक करत काचा फोडल्या, पोस्टर फाडले. घोषणाबाजी करत ठिय्या मारल्याने रात्री उशिरापर्यंत तणावाचे वातावरण होते. गावभाग पोलिसांनी तरुणांची समजूत काढत त्यांना पोलिस ठाण्यात नेले.
याबाबत घटनास्थळ व पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, पलूस येथील यश यादव हा येथील श्रद्धा अकॅडमीमध्ये इयत्ता बारावीमध्ये शिक्षण घेत होता. तो सुतार मळा परिसरात असलेल्या भंडारी होस्टेलमध्ये राहण्यास होता. मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे यश हा आंघोळीसाठी बाथरूममध्ये गेला होता. परंतु बराच वेळ झाला तरी तो बाथरूममधून बाहेर आला नाही. काहीजणांनी बाथरूमच्या खिडकीतून डोकावून पाहिले असता यश याने गळफास लावून घेतल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे तातडीने बाथरूमचा दरवाजा तोडून यश याला बाहेर काढत जवळच असलेल्या एका खासगी रुग्णालयात नेले. तेथून इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात हलविले. त्याठिकाणी उपचारापूर्वीच यश याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, याबाबतची माहिती मिळाल्यानंतर यश याचे नातेवाईक तातडीने इचलकरंजीत दाखल झाले. रुग्णालय आणि होस्टेलमधून माहिती घेत त्यांनी यश याच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला आहे. यश याचे शवविच्छेदन इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय येथे न करता कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात करण्याची मागणी केली. त्यानुसार यश याचा मृतदेह सीपीआर रुग्णालयाकडे पाठविला. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच यश याच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. दरम्यान, खाजगी रुग्णालयाकडून देण्यात आलेल्या वर्दीवरुन गावभाग पोलिस ठाण्यात मृत अशी नोंद केली आहे.
दुपारनंतर तरुणांच्या संतप्त जमावाने सुतार मळ्यातील श्रद्धा अकॅडमीवर हल्ला चढवत काचा फोडत पोस्टर फाडले. याबाबत माहिती समजताच गावभागचे पोलिस दाखल झाले. यावेळी अकॅडमीबाबत संतप्त भावना व्यक्त करत जोरदार घोषणाबाजी केली. संबंधित विद्यार्थ्याला न्याय द्या, अशी मागणी केली. आंदोलकांनी ठिय्या मारल्याने रात्री उशिरापर्यंत तणावाचे वातावरण होते. अखेर पोलिसांनी त्यांची समजूत काढत त्यांना गावभाग पोलिस ठाण्यात नेले.
नातेवाइकांनी व्यक्त केला संशय
नातेवाइकांनी घेतलेल्या माहितीवरून यश याने होस्टेलच्या बाथरूममध्ये गळ्यातील टॉयने गळफास घेऊन आत्महत्या केली. हे शक्य वाटत नाही. त्यामुळे त्याचे शवविच्छेदनदेखील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयाऐवजी कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात करण्याची मागणी केली. त्यानुसार यश याचे पार्थिव सीपीआर रुग्णालयात नेण्यात आले.