राऊत यांच्याकडून सोनवडे गाव दत्तक

By Admin | Updated: December 19, 2014 23:30 IST2014-12-19T21:41:50+5:302014-12-19T23:30:22+5:30

जिल्ह्यातील तीन गावांना ‘आदर्श’ गाव होण्याचा मान

Sonawde village adopted from Raut | राऊत यांच्याकडून सोनवडे गाव दत्तक

राऊत यांच्याकडून सोनवडे गाव दत्तक

कोल्हापूर : राज्यसभा सदस्य आणि शिवसेना गटनेते खासदार संजय राऊत यांनी शाहूवाडी तालुक्यातील सोनवडे गाव आदर्श करण्यासाठी दत्तक घेतले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील तीन गावांना ‘आदर्श’ गाव होण्याचा मान मिळाला
आहे. कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांनी चंदगड तालुक्यातील राजगोळी खुर्द, तर खासदार राजू शेट्टी यांनी शाहूवाडी तालुक्यातील पेरिड गाव दत्तक घेतले आहे. सोनवडे गावचे सुपुत्र प्राचार्य दिलीप पाटील यांनी पाठपुरावा केल्यामुळे शाहूवाडी तालुक्यातील आणखी एक म्हणजे सोनवडे गावची निवड खासदार राऊत यांनी केली आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील तीन गावे आदर्श होणार आहेत.
सोनवडेची लोकसंख्या सुमारे तीन हजार आहे. शासनाच्या सर्व योजना अतिशय पारदर्शकपणे आणि प्रभावीपणे राबवून राज्यात सोनवडे गाव आदर्श करण्याचा संकल्प खासदार राऊत यांनी केला आहे. प्राचार्य पाटील गेल्या २५ वर्षांपासून मुंंबई विद्यापीठात ‘ग्रामीण विकास’ हा विषय शिकवतात. त्यांनी सोनवडे गावच्या निवडीसाठी प्रयत्न केले. खासदार राऊत यांनी सोनवडे गावची निवड केल्याने या गावच्या विकासाला हातभार लागणार आहे.
ज्या गावाने आम्हाला घडविले, त्या मातीचे ऋण फेडायचे असेल, तर त्या गावच्या विकासास हातभार लावायला हवा, असा प्रयत्न होता. व्यक्तिगत पातळीवर हे करणे शक्य नव्हते. त्यामुळे खासदार राऊत यांच्याकडे तसा पाठपुरावा केला व त्यांनी हे गाव दत्तक घेतले याचा खूप आनंद असल्याची भावना
प्राचार्य पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. (प्रतिनिधी)

Web Title: Sonawde village adopted from Raut