सरपंच आरक्षण २७ तारखेला विजेत्या उमेदवारांना धाकधुक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:23 IST2021-01-21T04:23:12+5:302021-01-21T04:23:12+5:30
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील १०२५ ग्रामपंचायतींची २०२१ ते २०२५ या कालावधीतील सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत बुधवारी (दि. २७) सकाळी ११ ...

सरपंच आरक्षण २७ तारखेला विजेत्या उमेदवारांना धाकधुक
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील १०२५ ग्रामपंचायतींची २०२१ ते २०२५ या कालावधीतील सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत बुधवारी (दि. २७) सकाळी ११ वाजता होणार असल्याचे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी बुधवारी दिले. यात बिनविरोध ४, निवडणूक झालेल्या ३८६ व पुढे निवडणूक होऊ घातलेल्या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. आरक्षणाची तारीख आता जाहीर झाल्याने विजयी झालेल्या उमेदवारांमध्ये धाकधुक वाढली आहे.
ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीची मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्याने आरक्षणाची आकडेवारी, आरक्षण काढण्यासाठी ठिकाण व इतर सूचना कायम ठेवून तालुकानिहाय संबंधित तालुक्याच्या तहसीलदारांना जिल्हाधिकारी यांच्या वतीने नियुक्त करण्यात येऊन आरक्षण सोडतीची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यात नुकतीच निवडणूक झालेल्या ४३३ ग्रामपंचायती व पुढील पाच वर्षांच्या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
राज्य निवडणूक आयोगाने सरपंचपदाचे आरक्षण निवडणुकीच्या आधी म्हणजेच १५ डिसेंबर रोजी जाहीर केले होते. मात्र त्यानंतर हा निर्णय बदलून निवडणुकीनंतर लवकरात लवकर आरक्षण सोडत कार्यक्रम घ्यावा, असा आदेश देण्यात आला. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी बुधवारी आरक्षणाची तारीख जाहीर केली. तसेच सर्व उपविभागीय अधिकाऱ्यांना संबंधित तालुक्यातील तहसीलदार यांची तत्काळ बैठक घेऊन आरक्षण सोडत पारदर्शकपणे करण्याचे तसेच राज्य निवडणूक आयोगाकडील मार्गदर्शक सूचना व आदेशानुसार कार्यवाही करण्यासंंबंधी अवगत करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
सरपंचपदाचे आरक्षण काय पडते यावर विजयी झालेल्यांपैकी कोणत्या गटाचा सदस्य सरपंच होईल हे ठरणार आहे. जास्त जागांवर विजय मिळवलेल्या गटात त्या प्रवर्गानुसार सदस्य नसेल तर सरपंचपद दुसऱ्या गटाकडे जाण्याची शक्यता असते. त्यामुळे आरक्षणावरच गावचा कारभार कोणाकडे जाणार हे ठरणार असल्याने विजयी उमेदवारांमध्ये धाकधुक वाढली आहे.
--
सरपंचपदासाठी आरक्षित प्रवर्ग : आरक्षित सरपंच पदाची संख्या
अनुसूचित जाती : १३८ (६९ महिला)
अनुसूचित जमाती : ८ (४ महिला)
नागरिकांचा मागास प्रवर्ग : २७७ (१३९ महिला)
सर्वसाधारण : ६०२ (३०१ महिला)
--
तालुक्याचे नाव : ग्रामपंचायतींची संख्या
शाहूवाडी : १०६
पन्हाळा : १११
हताकणंगले : ६०
शिरोळ : ५२
करवीर : ११८
गगनबावडा : २९
राधानगरी : ९८
कागल : ८३
भुदरगड : ९७
आजरा : ७३
गडहिंग्लज : ८९
चंदगड : १०९
एकूण : १ हजार २५
....................