एस. टी. च्या रत्नागिरी विभागाला दरमहा ७ कोटींचा तोटा-- - उत्पन्नापेक्षा खर्चच अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2019 02:13 PM2019-11-22T14:13:45+5:302019-11-22T14:15:14+5:30

रत्नागिरी आगारामध्ये स्पेअर पार्टस्चा अभाव, शिवाय डिझेल टंचाईमुळे वाहतुकीवर परिणाम झाला. सलग दोन दिवस ग्रामीण व शहरी मार्गावरील वाहतुकीच्या ६००पेक्षा अधिक फेऱ्या बंद राहिल्याने ९ लाखाचा फटका बसला. रत्नागिरी आगाराचे मासिक उत्पन्न ४ कोटी ६२ लाख आहे. १२ लाख २० हजार किलोमीटर प्रवास होतो.

S. T Loss of Rs. 5 crores per month to the Ratnagiri Department | एस. टी. च्या रत्नागिरी विभागाला दरमहा ७ कोटींचा तोटा-- - उत्पन्नापेक्षा खर्चच अधिक

एस. टी. च्या रत्नागिरी विभागाला दरमहा ७ कोटींचा तोटा-- - उत्पन्नापेक्षा खर्चच अधिक

Next
ठळक मुद्देरत्नागिरीत डिझेल खरेदीलाही निधी नसल्याने प्रवाशांचे हाल

रत्नागिरी : रत्नागिरी एस. टी. विभागाच्या एकूण उत्पन्नापेक्षा खर्च अधिक आहे. गणेशोत्सव आणि मे महिन्यात जादा उत्पन्न मिळत असले अन्य दहा महिने खर्चाचा ताळमेळ बसविणे अवघड बनले आहे. रत्नागिरी विभागाला दरमहा ७ कोटी ५ लाखाचा तोटा सोसावा लागत आहे.

रत्नागिरी आगारामध्ये स्पेअर पार्टस्चा अभाव, शिवाय डिझेल टंचाईमुळे वाहतुकीवर परिणाम झाला. सलग दोन दिवस ग्रामीण व शहरी मार्गावरील वाहतुकीच्या ६००पेक्षा अधिक फेऱ्या बंद राहिल्याने ९ लाखाचा फटका बसला. रत्नागिरी आगाराचे मासिक उत्पन्न ४ कोटी ६२ लाख आहे. १२ लाख २० हजार किलोमीटर प्रवास होतो. परंतु ६ कोटी २५ लाख ५८ हजार इतका खर्च असल्यामुळे दरमहा १ ते दीड कोटीचा तोटा सोसावा लागत आहे. रत्नागिरी आगाराप्रमाणेच अन्य आठ आगारांची स्थिती यापेक्षा वेगळी नाही.

रत्नागिरी विभागाचे दरमहा २२ कोटी ७४ लाख ५७ हजार इतके उत्पन्न आहे. ६१ लाख ४६ हजार किलोमीटर प्रवास होत असल्याने २९ कोटी ७९ लाख ६२ हजार इतका खर्च होत आहे. त्यामुळे दरमहा ७ कोटी ५ लाखांचा तोटा सोसावा लागत आहे. गणेशोत्सव व मे महिन्यात सोडल्या जाणाऱ्या जादा गाड्यांमुळे मिळणाऱ्या उत्पन्नामुळे दोन महिन्यात काहीशी तूट भरुन निघण्यास मदत होत असली तरी उर्वरित दहा महिने विभागाला आर्थिक तोटाच सोसावा लागत आहे. वर्षभराचा तोटा ७० कोटींमध्ये जात असल्याने विभागाला महामंडळाकडून आर्थिक सहकार्य केले जात आहे.

रत्नागिरी विभागाला डिझेलसाठी दररोज ३५ ते ४० लाख रुपये खर्च येतो. डिझेलचे पैसे एक दिवस आधी ऑनलाईनने भरले तरच दुसऱ्या दिवशी डिझेल पुरवठा उपलब्ध होतो. परंतु उत्पन्नच घटल्यामुळे प्रशासनाला खर्च भागवणे अवघड बनले आहे. डिझेलप्रमाणे स्पेअर पार्टस्चाही तुटवडा भासत आहे. स्पेअर पार्टस् उपलब्ध नसल्यामुळे नादुरुस्त गाड्यांचे प्रमाण वाढत आहे. स्पेअर पार्टस्साठीच्या आधी करण्यात आलेल्या खरेदीचे तब्बल ४ कोटी रुपये देणे शिल्लक असल्यामुळे नव्याने स्पेअर पार्टस् उपलब्ध होणे अवघड बनले आहे.

खासगी वाहतुकीमध्ये झालेली वाढ, कर्मचाऱ्यांची कमतरता, स्पेअर पार्टअभावी बंद पडणाऱ्या बसेस, महामंडळाची धोरणे, राजकीय अनास्था इत्यादीमुळे एसटीच्या उत्पन्नात दिवसेंदिवस घट होत आहे. ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, शालेय विद्यार्थी तसेच इतरांना सवलतीच्या दरात एसटी सुविधा उपलब्ध केली जाते. परंतु शासनाकडून त्याची रक्कम वेळेवर मिळत नाही. त्यामुळे त्याचाही परिणाम एस. टी.च्या उत्पन्नावर मोठ्या प्रमाणात झाला आहे.

 


भारमान कमी
डिझेलचे पैसे उपलब्ध करणे अवघड झाल्याने डिझेल टंचाईमुळे वाहतुकीवर परिणाम झाला. अखेर रत्नागिरी विभागाने डिझेल पुरवठ्यासाठी पैसे जमा केले. त्यामुळे टँकरची उपलब्धता झाली. परंतु भारमान कमी होत असल्याने हे संकट वारंवार उभे राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
 

रत्नागिरी एस. टी. विभागाच्या उत्पन्नापेक्षा खर्चाचा आकडा मोठा आहे. दरमहा ७ कोटीचा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. याबाबत मध्यवर्ती कार्यालयाकडे माहिती देण्यात आली आहे. गणेशोत्सव व मे महिन्यात आर्थिक उत्पन्नाचा हातभार लागता असला तरी अन्य दहा महिने मात्र हा तोटा कमी जास्त प्रमाणात सोसावाच लागत आहे.
- सुनील भोकरे,
विभाग नियंत्रक, रत्नागिरी विभाग.
 

Web Title: S. T Loss of Rs. 5 crores per month to the Ratnagiri Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.