अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीचा सुधारित कार्यक्रम अखेर जाहीर

By संदीप आडनाईक | Updated: May 19, 2026 00:14 IST2026-05-19T00:13:32+5:302026-05-19T00:14:27+5:30

१९ मेपासून उमेदवारी अर्ज प्रक्रिया, मतदान ७ जून रोजी,८ जून रोजी मतमोजणी व निकाल

Revised schedule for All India Marathi Film Corporation elections finally announced | अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीचा सुधारित कार्यक्रम अखेर जाहीर

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीचा सुधारित कार्यक्रम अखेर जाहीर

संदीप आडनाईक, लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर: सर्वोच्च न्यायालयाने अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीवरील स्थगिती नुकतीच उठवल्यामुळे सहा वर्षे प्रलंबित राहिलेल्या या कार्यकारी मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीचा सुधारित कार्यक्रम अखेर जाहीर करण्यात आला आहे. १९ मेपासून उमेदवारी अर्ज प्रक्रिया सुरू होणार असून आवश्यक असल्यास मतदान ७ जून रोजी कोल्हापूर, मुंबई आणि पुणे येथे होणार असून ८ जून रोजी मतमोजणी व निकाल जाहीर केला जाणार आहे.

२०२६-२७ ते २०३१-३२ या कालावधीसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून मतदान आणि मतमोजणीपर्यंतचे वेळापत्रक निवडणूक अधिकाऱ्यांकडून प्रसिद्ध करण्यात आले. न्यास नोंदणी क्र. एफ-१२७/को. असलेल्या महामंडळाच्या निवडणुकीसंदर्भात २०२२ मध्ये धर्मादाय उपआयुक्त कार्यालयाने आदेश दिले होते. त्यानुसार तत्कालीन निरीक्षक  यांची मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती केली होती. त्यावेळी प्राथमिक निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली होती. मात्र, दि. ११ जानेवारी २०२३ रोजी मुंबई उच्च न्यायालय यांनी निवडणुकीस स्थगिती दिली होती. यानंतर दि. ७ मे २०२६ रोजी सर्वोच्च न्यायालय आणि दि. १७ मे २०२६ रोजी धर्मादाय सहआयुक्त, कोल्हापूर विभाग यांच्या आदेशानंतर निवडणूक प्रक्रियेला पुन्हा गती मिळाली आहे.

१९ मेपासून उमेदवारी अर्ज प्रक्रिया

सुधारित कार्यक्रमानुसार दि. १९ मे ते २२ मे २०२६ दरम्यान उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. २५ मे रोजी उमेदवारांची यादी प्रसिद्ध होणार असून त्याच दिवशी अर्जांची छाननी केली जाणार आहे. २६ ते २८ मे दरम्यान अर्ज माघारीची मुदत ठेवली आहे. त्यानंतर २९ मे रोजी अंतिम उमेदवार यादी व निवडणूक चिन्हांचे वाटप जाहीर केले जाईल. आवश्यक असल्यास मतदान ७ जून रोजी कोल्हापूर, मुंबई आणि पुणे येथे होणार असून ८ जून रोजी मतमोजणी व निकाल जाहीर केला जाणार आहे.

१७ सदस्यांचे कार्यकारी मंडळ निवडले जाणार

महामंडळाच्या कार्यकारी मंडळासाठी एकूण १७ सदस्यांची निवड केली जाणार आहे. यामध्ये निर्माता, दिग्दर्शक, लेखक, छायाचित्रण, अभिनेता, अभिनेत्री, संगीत, नृत्य, ध्वनी, रंगभूषा, वितरण, प्रसिद्धी, कामगार आदी विविध विभागांचे प्रतिनिधित्व असणार आहे.

उमेदवारी अर्जासाठी शुल्क व अनामत रक्कम

निवडणूक नियमांनुसार उमेदवारी अर्जाची किंमत २०० रुपये ठेवली आहे. तसेच उमेदवारांनी अर्जासोबत ५ हजार रुपयांची अनामत रक्कम रोखीने जमा करणे बंधनकारक राहणार आहे.

बिनविरोध निवडीचीही तरतूद

अर्ज माघारीनंतर संबंधित विभागात उमेदवारांची संख्या जागांइतकी किंवा त्यापेक्षा कमी राहिल्यास संबंधित उमेदवारांना बिनविरोध निवडून आल्याचे जाहीर केले जाणार असल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

मतदान केंद्र बदलासाठी लेखी संमती आवश्यक

कोल्हापूर, मुंबई आणि पुणे येथील मतदान केंद्रांव्यतिरिक्त अन्य केंद्रावर मतदान करावयाचे असल्यास सभासदांनी १९ ते २९ मेदरम्यान लेखी संमतीपत्र निवडणूक कार्यालयात सादर करणे आवश्यक राहणार आहे.

रागिणी खडके यांच्याकडून नोटीस प्रसिद्ध

निवडणूक अधिकारी तथा सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाच्या निरीक्षक यांनी दि. १८ मे २०२६ रोजी सही व शिक्क्यासह ही अधिकृत नोटीस प्रसिद्ध केली आहे. निवडणुकीचे प्रधान कार्यालय खासबाग, कोल्हापूर येथील श्री गणेश अपार्टमेंटमध्ये राहणार असल्याचेही नोटिशीत नमूद आहे.

Web Title : अदालत द्वारा रोक हटाने के बाद मराठी फिल्म कॉर्पोरेशन चुनाव कार्यक्रम घोषित

Web Summary : अखिल भारतीय मराठी फिल्म कॉर्पोरेशन चुनाव कार्यक्रम छह साल की देरी के बाद जारी किया गया। नामांकन 19 मई से शुरू; मतदान, यदि आवश्यक हो, 7 जून को कोल्हापुर, मुंबई और पुणे में होगा। परिणाम 8 जून को घोषित किए जाएंगे। कार्यकारी बोर्ड के लिए सत्रह सदस्य चुने जाएंगे।

Web Title : Marathi Film Corporation Election Schedule Announced After Court Lifts Stay

Web Summary : The All India Marathi Film Corporation election schedule is out after a six-year delay. Nomination starts May 19th; voting, if needed, will be June 7th in Kolhapur, Mumbai, and Pune. Results will be declared June 8th. Seventeen members will be elected to the executive board.