कोल्हापूर येथे ५ मार्चपासून आठ जिल्ह्यांसाठी सैन्यभरती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:23 IST2021-01-21T04:23:14+5:302021-01-21T04:23:14+5:30

-जिल्हाधिकारी दौलत देसाई लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर आणि गोव्यातील उत्तर आणि दक्षिण ...

Recruitment for eight districts from March 5 in Kolhapur | कोल्हापूर येथे ५ मार्चपासून आठ जिल्ह्यांसाठी सैन्यभरती

कोल्हापूर येथे ५ मार्चपासून आठ जिल्ह्यांसाठी सैन्यभरती

-जिल्हाधिकारी दौलत देसाई

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर आणि गोव्यातील उत्तर आणि दक्षिण अशा आठ जिल्ह्यांतील पात्र उमेदवारांची सैन्यभरती प्रक्रिया ५ ते २५ मार्च या कालावधीत ‍शिवाजी विद्यापीठाच्या क्रीडांगणावर होणार आहे. ही भरती सुरळीत पार पाडण्यासाठी संबंधित विभागांनी नियोजन करावे, अशी सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी बुधवारी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, कर्नल पाल, प्रांताधिकारी वैभव नावडकर, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी निवृत्त कर्नल प्रदीप ढोले उपस्थित होते.

जिल्हाधिकारी म्हणाले, महापालिकेने भरतीच्या ठिकाणी सोडियम हायपोक्लोराइडची फवारणी करावी. उमेदवारांना भरतीच्या ठिकाणी जाण्यासाठी केएमटीच्या फेऱ्या सुरू ठेवाव्यात, आरोग्य विभागाने आवश्यक त्या मनुष्यबळासह आरोग्य पथके नियुक्त करावीत. रुग्णवाहिका, फिरते शौचालये, आवश्यक पोलीस बंदोबस्त, ब्रॉडबँड सुविधा, फर्निचर, पिण्याच्या पाण्याची सुविधा, विद्युत दिव्यांची सोय याबाबत संबंधित विभागाने नियोजन करावे.

कर्नल पाल यांनी सविस्तर माहिती दिली. गतवर्षी १७ ते २७ नोव्हेंबर या कालावधीत झालेल्या सैन्य भरतीसाठी ६० हजार पात्र उमेदवारांची नोंदणी झाली होती. त्यापैकी ४४ हजार ४४८ उमेदवार प्रक्रियेत सहभागी झाले. त्यातून एक हजार १८८ जणांची निवड झाली होती.

--

फोटो नं २००१२०२१-कोल-सैनिक भरती

ओळ : कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी सैनिक भरतीप्रक्रियेसंबंधी बैठक जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी कर्नल विक्रमादित्यासिंह पाल यांनी माहिती दिली.

--

Web Title: Recruitment for eight districts from March 5 in Kolhapur