राधानगरी धरण ८० टक्के भरले... कोल्हापूरकरांची धास्ती वाढली
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 12:12 IST2025-07-08T12:12:09+5:302025-07-08T12:12:34+5:30
जिल्ह्यात दिवसभर उघडझाप : पंचगंगेच्या पातळीत घट

छाया-गौरव सांगावकर
कोल्हापूर : जिल्ह्यात सोमवारी दिवसभर पावसाची उघडझाप राहिली. अधूनमधून जोरदार सरी कोसळत राहिल्या. धरणक्षेत्रातहीपाऊस सुरू असल्याने पाणीपातळीत वाढ होत आहे. राधानगरी धरण ८० टक्के तर वारणा ८२ टक्के भरल्याने कोल्हापूरकरांची धास्ती वाढली आहे. पावसाचा जोर कमी असल्याने पंचगंगा नदीच्या पातळीत घट होत असली तरी धरणातील साठा वाढत आहे आणि आगामी पावसाचे दिवस पाहिले तर महापुराचा धोका अधिक दिसतो.
गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जाेर कमी झाला आहे. पन्हाळा, शाहूवाडी, गगनबावडा, भुदरगड, राधानगरी तालुक्यांत तुलनेत अधिक पाऊस आहे. अधूनमधून का असेना पण येथे जोरदार पाऊस होत आहे. धरणक्षेत्रातही जोरदार सुरू असून, सरासरी ७० मिलिमीटर पेक्षा अधिक पाऊस असल्याने धरणाच्या साठ्यात वाढ होत आहे. राधानगरी ८० तर दूधगंगा ६५ टक्के भरले आहे. आगामी काळात पाऊस वाढला तर विसर्ग मोठ्या प्रमाणात करावा लागणार आहे. त्यामुळे पुराचा धोका वाढणार आहे.
दरम्यान, जिल्ह्यात सोमवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत २० खासगी मालमत्तांची पडझड होऊन पाच लाख ८९ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
अद्यापही ११ मार्ग बंद
जिल्ह्यात पुराचे पाणी रस्त्यावर आल्याने अकरा मार्ग बंद झाले आहेत. त्याचबरोबर ४८ बंधारे पाण्याखाली असल्याने एकूणच या मार्गावरील वाहतूक अद्याप सुरळीत झालेली नाही.
आठ धरणे भरली
जिल्ह्यात चित्री, जंगमहट्टी, घटप्रभा, जांबरे, आंबेओहोळ, सर्फनाला, धामणी, कोदे ही आठ धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत.