पालकमंत्र्यांच्या नेमणुकीची प्रक्रिया सुरू

By Admin | Updated: December 18, 2014 00:00 IST2014-12-17T23:33:38+5:302014-12-18T00:00:46+5:30

नियुक्त्या रद्द : भाजप-शिवसेनेत तणातणी

Process for appointment of Guardian Minister | पालकमंत्र्यांच्या नेमणुकीची प्रक्रिया सुरू

पालकमंत्र्यांच्या नेमणुकीची प्रक्रिया सुरू

कोल्हापूर : राज्यात सत्तेत आलेल्या भाजप-शिवसेनेच्या सरकारने आता राजकीय व प्रशासकीयदृष्ट्या स्थिरस्थावर झाल्यावर पालकमंत्री नियुक्तीची प्रक्रिया सुरू केली. पहिला टप्पा म्हणून नियोजन विभागाने जिल्हा नियोजन समित्यांवरील नामनिर्देशित व विशेष निमंत्रित सदस्यांच्या नियुक्त्या रद्द केल्या. नव्या सदस्यांची नियुक्तीची प्रक्रिया सुरू करावी, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
नियोजन विभागाचे उपसचिव अ. शि. बेळगुद्री यांनी त्यासंदर्भातील शासन आदेश आज, बुधवारी काढला. त्यानुसार सर्व जिल्हा नियोजन समित्यांवरील नामनिर्देशित सदस्य व विशेष निमंत्रित सदस्य या पदावरील नियुक्त्या त्वरित रद्द केल्या. या नियुक्त्या करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पालकमंत्री यांच्या शिफारशीने आवश्यक ते प्रस्ताव शासनाकडे पाठवावेत, असेही आदेशात म्हटले.
बरीच ओढाताण करून भाजप व शिवसेना सत्तेत एकत्र आली. आता पालकमंत्री नियुक्तीवरूनही दोन्ही पक्षांत चांगलीच तणातणी होऊ शकते. पालकमंत्री कोण असावा हा प्रत्येक जिल्ह्यांत कळीचा मुद्दा असतो. कोल्हापूर जिल्हा समितीवर डॉ. बुधाजीराव मुळीक हे ‘नामनिर्देशित सदस्य’ होते तर दहा आमदार, एक विधानपरिषद आमदार आणि दोन खासदार हे ‘विशेष निमंत्रित सदस्य’ होते. आता निवडणुकीनंतर आमदार व खासदारही बदलले असल्याने त्यांची नव्याने सदस्य म्हणून या समितीवर नियुक्ती होईल.
कोल्हापुरात चंद्रकांतदादांंना थेट कॅबिनेट मंत्री केल्यामुळे तेच पालकमंत्री असण्याची शक्यता आहे परंतु येथे दहापैकी सहा आमदार शिवसेनेचे आहेत. त्यामुळे एक राज्यमंत्री व पालकमंत्रिपद मिळावे, यासाठी सेनाही आग्रही आहे. अधिवेशन झाल्यानंतर पालकमंत्री नेमणूक केली जाईल, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Process for appointment of Guardian Minister