Kolhapur-TET Paper leak case: खासगी अकॅडमीतील शिक्षकास अटक, आरोपींची संख्या १९
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 11:35 IST2025-11-28T11:34:45+5:302025-11-28T11:35:10+5:30
अजून सहा जण पोलिसांच्या रडारवर

Kolhapur-TET Paper leak case: खासगी अकॅडमीतील शिक्षकास अटक, आरोपींची संख्या १९
मुरगूड : टीईटी पेपरफुटी प्रकरणाच्या तपासात मुरगूड पोलिसांनी एका संशयिताला अटक केली. यामुळे या प्रकरणातील अटक आरोपींची संख्या एकोणावीसवर पोहोचली आहे. गुरुवारी अटक करण्यात आलेला अनिल अशोक हंचनाळे (वय ३८, रा. नंदगाव, ता. करवीर) हा एका खासगी अकॅडमीत शिक्षक म्हणून कार्यरत असल्याची माहिती पुढे आली आहे.
हंचनाळे याला कागल येथील प्रथमवर्ग न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने १ डिसेंबरपर्यंत चार दिवसांची पोलिस कोठडी दिली. तपासादरम्यान आरोपीकडून काही महत्त्वाचे दस्तऐवज, मोबाइल रेकॉर्ड व व्यवहाराशी संबंधित माहिती मिळण्याची शक्यता असल्यामुळे पोलिसांनी कोठडीची मागणी केली होती.
सोनगे येथे टीईटी पेपरफुटी रॅकेटवर छापा टाकून पोलिसांनी पहिल्या टप्प्यात ९ आरोपी, तर दुसऱ्या टप्प्यात आणखी ९ आरोपींना अटक केली होती. या दोन्ही कारवायांनंतर रॅकेटचे जाळे अधिक विस्तृत असल्याचे उघड झाले होते. तिसऱ्या टप्प्यात झालेली अटक या रॅकेटची व्याप्ती आणि संगनमत किती खोलवर आहे, हे अधिक स्पष्ट करते.
पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, गडहिंग्लज, करवीर आणि कागल परिसरातील आणखी सहा संशयित रडारवर आहेत. या सर्वांनी पेपरफुटी व्यवहारात आर्थिक किंवा तांत्रिक स्वरूपाचा सहभाग घेतल्याचा संशय व्यक्त केला जात असून, त्यांच्यावर नजर ठेवण्यात येत आहे.
या प्रकरणामागे बिहार-उत्तर प्रदेश कनेक्शन असल्याचे तपासात समोर आले असून, या राज्यांतील संशयितांपर्यंत पोहोचण्यासाठी मुरगूड पोलिसांचे विशेष पथक बिहारकडे रवाना झाले आहे. पेपरफुटीचे मूळ स्रोत, प्रश्नपत्रिका मिळण्याचे मार्ग, व्यवहारातील मध्यस्थ यांचा तपास सुरू आहे.