उदगावात ‘स्वाभिमानी’ची सत्ता अबाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:21 IST2021-01-21T04:21:37+5:302021-01-21T04:21:37+5:30

शुभम गायकवाड उदगांव : येथील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी स्वाभिमानी विरुद्ध काँग्रेस, यड्रावकर गट, शिवसेना यांची महाविकास आघाडी अशी दुरंगी लढत ...

The power of 'Swabhimani' is unaffected | उदगावात ‘स्वाभिमानी’ची सत्ता अबाधित

उदगावात ‘स्वाभिमानी’ची सत्ता अबाधित

शुभम गायकवाड

उदगांव : येथील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी स्वाभिमानी विरुद्ध काँग्रेस, यड्रावकर गट, शिवसेना यांची महाविकास आघाडी अशी दुरंगी लढत झाली. अटीतटीच्या लढतीत स्वाभिमानीला नऊ, तर महाविकास आघाडीला आठ जागा मिळाल्या. जन्मभूमीत स्वाभिमानीला तिसऱ्यांदा सत्ता अबाधित ठेवण्यात यश आले. परंतु, काठावरच्या बहुमताने स्वाभिमानीची डोकेदुखी वाढली आहे.

गेली दहा वर्षे येथील सत्ता स्वाभिमानीकडे आहे. उदगाव हा स्वाभिमानीचा बालेकिल्ला असल्याने हे गाव त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे होते. पेयजलचे राजकारण, गावचा खुंटलेला विकास यावरून विरोधकांनी रणकंदन केले होते. परंतु, विरोधकांना त्यात यश आले नाही.

विकासकामांची अनेक आश्वासने स्वाभिमानीने जाहीरनाम्यात दिली आहेत. ग्रामपंचायतीचा थकलेला कर, लघुउद्योजकांना प्रोत्साहन, महसूल वाढीसाठी प्रयत्न, आदी आव्हाने त्यांच्यासमोर असणार आहेत. ‘ स्वाभिमानी’कडून माजी बांधकाम सभापती सावकर मादनाईक, प्रा. राजाराम वरेकर यांनी नेतृत्व केले, तर आघाडीकडून समाजकल्याण सभापती स्वाती सासणे, राजू मगदूम, बाळासो कोळी यांनी नेतृत्व केले.

अपक्षांनी आणले जेरीस

प्रभाग एक हा स्वाभिमानीचा बालेकिल्ला मानला जात होता. परंतु, उमेदवार निवडीत केलेली चूक स्वाभिमानीला भोवली. तिथे आघाडीचे उमेदवार निवडून आले, तर प्रभाग चारमध्ये आघाडीकडून दोन बंडखोरांनी पाचशेच्यावर मते मिळविल्याने त्याचा फटका आघाडीच्या पॅनेलप्रमुखांना बसला. त्या ठिकाणी स्वाभिमानीचे उमेदवार निवडून आले.

अर्ज भरतानाची चूक महागात

प्रभाग पाचसाठी एक जागा सर्वसाधारण महिला व एक जागा सर्वसाधारण अशी होती. आघाडीच्या उमेदवाराने सर्वसाधारण महिला ऐवजी सर्वसाधारण जागेसाठी अर्ज भरल्याने महिला जागेसाठी स्वाभिमानीच्या सुनीता चौगुले या बिनविरोध निवडून आल्या. या एका जागेमुळेच आघाडीचे सत्तेचे स्वप्न भंगले.

Web Title: The power of 'Swabhimani' is unaffected