चक्क पोलीसगाडीच पेटवली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:28 IST2021-09-23T04:28:42+5:302021-09-23T04:28:42+5:30

कोल्हापूर : माथेफिरूने चक्क पोलिसांच्या मोटारीवरच पेट्रोल टाकून तिला आग लावली. हा प्रकार बुधवारी दुपारी नेहमी गजबजलेल्या स्टेशन रोडवरील ...

The police car was set on fire! | चक्क पोलीसगाडीच पेटवली!

चक्क पोलीसगाडीच पेटवली!

कोल्हापूर : माथेफिरूने चक्क पोलिसांच्या मोटारीवरच पेट्रोल टाकून तिला आग लावली. हा प्रकार बुधवारी दुपारी नेहमी गजबजलेल्या स्टेशन रोडवरील शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या प्रवेशदारातच घडला. पोलीस ठाण्याच्या आवारातील काही पोलिसांच्या वेळीच हा प्रकार लक्षात आल्याने आग विझवण्यासाठी त्यांची तारांबळ उडाली आणि पुढील अनर्थ टळला. यात मोटारीचे किरकोळ नुकसान झाले.

याविषयी घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी की, बुधवारी दुपारी पावणेचार वाजता शाहूपुरी पोलिसांची डायल ११२ नंबरची मोटार पोलीस ठाण्याच्या दारात उभी होती. त्यावेळी दाभोळकर चौकाकडून आलेल्या एका माथेफिरुने त्या मोटारीजवळ येऊन सोबतच्या बाटलीतील पेट्रोल मोटारीच्या बॉनेटवर ओतले. परिसरातील काहींनी हा प्रकार पाहिला, पण तो माथेफिरु मोटारीवर पाणी ओतत असेल, असे वाटल्याने त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले. पण नंतर त्याने खिशातील काडीपेटी काढून काडी ओढून मोटारीच्या बॉनेटला आग लावली. ही गोष्ट लक्षात आल्यानंतर मात्र परिसरातील पोलीस व नागरिकांमध्ये गोंधळ उडाला. काही पोलिसांनी तातडीने ठाणे अंमलदार कक्षातील अग्निशमन कुपी आणून त्यातील गॅस आगीवर फवारल्याने आग विझली आणि पुढील अनर्थ टळला. विशेष म्हणजे, आग लावल्यानंतर माथेफिरु हसतच त्या आगीकडे पाहत होता. पोलिसांनी तातडीने त्याला ताब्यात घेतले. पण या प्रकारामुळे परिसरात काही काळ गोंधळ उडाला. संबंधित मोटारीचे किरकोळ नुकसान झाले. पण पोलिसांनी काही वेळातच मोटारगाडीची साफसफाई करुन धुवून ती पुन्हा पोलीस ठाण्याच्या दारात आणली.

Web Title: The police car was set on fire!