कोल्हापुरात पोलिसालाच घातला गंडा, बदलीसाठी उकळले साडेतेरा लाख

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 11:46 IST2025-02-10T11:44:46+5:302025-02-10T11:46:08+5:30

भामटा सबनीस याची राजकीय नेत्यांसोबत ऊठबस

One duped a constable of Jaisingpur police station of Rs 13 lakh by claiming to transfer him to the highway traffic branch in kolhapur | कोल्हापुरात पोलिसालाच घातला गंडा, बदलीसाठी उकळले साडेतेरा लाख

कोल्हापुरात पोलिसालाच घातला गंडा, बदलीसाठी उकळले साडेतेरा लाख

कोल्हापूर : मंत्री आणि वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना सांगून हायवे ट्रॅफिक शाखेकडे बदली करून देतो, असे सांगून एकाने जयसिंगपूर पोलिस ठाण्यातील कॉन्स्टेबलला १३ लाख ६० हजार रुपयांचा गंडा घातला. याबाबत कॉन्स्टेबल प्रमोद नरसिंगा बेनाडे (वय ५१, रा. रुई, ता. हातकणंगले) यांनी शनिवारी (दि. ८) शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने भामटा मनोज प्रकाश सबनीस (३२, रा. तारदाळ, ता. हातकणंगले) याला अटक केली. त्याची मंगळवार (दि. ११)पर्यंत पोलिस कोठडीत रवानगी झाली.

फिर्यादी कॉन्स्टेबल प्रमोद बेनाडे हे सध्या जयसिंगपूर पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. त्यांच्या ओळखीतील मनोज सबनीस हा पोलिसांच्या बदल्या करून देत असल्याचे सांगत होता. मंत्री आणि वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी असलेल्या ओळखीतून हायवे ट्रॅफिक शाखेकडे बदली करून देण्याचे आमिष त्याने बेनाडे यांना दाखवले. यासाठी १ डिसेंबर २०२३ ते ३० एप्रिल २०२४ या कालावधीत त्याने बेनाडे यांच्याकडून वेळोवेळी १३ लाख ६० हजार रुपये उकळले. यांतील काही रक्कम शहरातील परिख पूल येथील इंडसइंड बँकेत खात्यावर भरून घेतली. काही रक्कम रोख आणि गुगल पेद्वारे घेतली.

तातडीने अटक

पैसे देऊनही बदलीचे काम होत नसल्याने बेनाडे यांनी सबनीस याच्यामागे पैसे परत देण्याचा तगादा लावला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी तातडीने करवाई करीत सबनीस याला अटक केली.

रुबाबाची भुरळ

भामटा सबनीस याची राजकीय नेत्यांसोबत ऊठबस असते. त्यांच्यासोबतचे फोटो सोशल मीडियात झळकावून तो रुबाब करीत होता. याचेच भांडवल करून तो शासकीय कर्मचारी, अधिकाऱ्यांना बदल्यांचे आमिष दाखवून गंडा घालत होता. यापूर्वी नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचा एक गुन्हा त्याच्यावर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दाखल आहे, अशी माहिती पोलिसांच्या चौकशीत समोर आली.

पोलिस महासंचालक कार्यालयातून बदली

हायवे ट्रॅफिक शाखेकडील बदल्यांची प्रक्रिया थेट पोलिस महासंचालक कार्यालयाकडून होते. यासाठी इच्छुकांचे अर्ज पोलिस अधीक्षकांमार्फत महासंचालक कार्यालयात पाठवले जातात. त्यानंतर संबंधित पोलिसांची महासंचालकांकडून नियुक्ती केली जाते.

Web Title: One duped a constable of Jaisingpur police station of Rs 13 lakh by claiming to transfer him to the highway traffic branch in kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.