कोल्हापूर, सांगलीत पावसाच्या तुरळक सरी; दिवसभर थंड वारे
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 13:17 IST2026-01-12T13:16:39+5:302026-01-12T13:17:47+5:30
आज, उद्या, जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता

कोल्हापूर, सांगलीत पावसाच्या तुरळक सरी; दिवसभर थंड वारे
कोल्हापूर : जिल्ह्यात रविवारी सायंकाळी कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या.
मध्यंतरी थंडीचा कडाका वाढला होता, पण रविवार सकाळपासून वातावरणात बदल होत गेला. सकाळी ऊन तर दिवसभरात अधूनमधून आकाश ढगाळ व्हायचे. सायंकाळी अनेक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. आज, सोमवार व उद्या, मंगळवारी जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
दिवसभर थंड वारे...
कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात दिवसभर थंड वारे जोरात वाहत होते. त्यात ढगाळ हवामानामुळे हवेत काहीसा गारठा जाणवत होता.
सांगलीत पावसाच्या हलक्या सरी
सांगली : सांगली शहरासह परिसरात रविवारी रात्री अचानक पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. तापमान तुलनेने कमी असतानाही रविवारीच पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त करण्यात आले.
संध्याकाळनंतर हवेत गारवा जाणवत होता. रात्रीच्या सुमारास काही काळ पावसाच्या हलक्या सरी बरसल्यामुळे रस्त्यांवर ओलावा निर्माण झाला. पावसाचे प्रमाण अल्प असल्याने जनजीवनावर विशेष परिणाम झाला नसला, तरी अचानक झालेल्या पावसामुळे काही भागांत दुचाकीस्वार व पादचाऱ्यांची तारांबळ उडाली.