कोंबडी बाझारच्या जागेवर होणार व्यापारी संकुल

By Admin | Updated: January 14, 2015 00:37 IST2015-01-13T00:03:26+5:302015-01-14T00:37:26+5:30

मनपाने मागितल्या हरकती-सूचना : ४१ विस्थापितांना गाळे देण्याचा प्रस्ताव

The merchandise package will be at the place of chicken bazaar | कोंबडी बाझारच्या जागेवर होणार व्यापारी संकुल

कोंबडी बाझारच्या जागेवर होणार व्यापारी संकुल

कोल्हापूर : महापालिकेच्या शाहू क्लॉथ मार्केटला लागून असलेल्या कोंबडी बाझारच्या १२ हजार चौरस फूट जागेवर भव्य व्यापारी संकुल उभारण्याची संकल्पना प्रशासनाने आखली आहे. येथील ४१ विस्थापित गाळेधारकांना नव्या संकुलात जागा दिली जाणार आहे.
आज, सोमवारी नगरसेविका ज्योत्न्सा पवार-मेढे यांनी गाळेधारकांची बैठक घेऊन प्रकल्पाचे सादरीकरण केले. प्रकल्पाबाबत हरकती व सूचना असल्यास देण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.कोंबडी बाझारची एकूण जागा १२ हजार चौरस फूट आहे. या जागेवर भव्य पाच मजली व्यापारी संकुल उभारण्यात येणार आहे. ‘बांधा वापरा आणि हस्तांतरित करा’ (बीओटी) तत्त्वावर प्रकल्पाची उभारणी करण्यात येणार आहे.
पहिल्या व तळमजल्यावर पार्किंग व ४१ गाळेधारकांना दुकानांसाठी जागा देण्यात येणार आहे. पाचपैकी तीन मजले विकासकास ३० वर्षांसाठी देण्यात येणार आहेत. पाचव्या मजल्यावर महापालिकेला दोन कार्यालय व बहुउद्देशीय सभागृह असणार आहे, अशी माहिती प्रकल्प विभागाचे अभियंता सुरेश पाटील व माजी नगरसेवक बाळकृष्ण मेढे यांनी दिली.
अधिक सक्षमपणे व्यापार करण्यास उत्तेजन मिळणार असल्याने या प्रकल्पास येथील भाडेधारक व्यापाऱ्यांनी सहकार्य करण्याचे आवाहन बाळकृष्ण मेढे यांनी केले. प्रकल्पाबाबत काही सूचना व हरक ती असल्यास याबाबत महापालिका प्रशासनाशी संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. (प्रतिनिधी)


गाळेधारकांना संपूर्ण प्रकल्पाची माहिती चित्रफितीच्या माध्यमातून दाखविण्यात आली. सध्या रस्त्यांवर व पत्र्याच्या शेडमध्ये व्यवसाय करणाऱ्यांना सुस्थितीतील जागा व्यवसायासाठी उपलब्ध होणार आहे. व्यापारी संकुलामुळे परिसराचे रूपडे बदलणार आहे. प्रशस्त अशी पार्किंगची सोय झाल्याने वाहतुकीची कोंडी कमी होईल. संकुलाचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत गाळेधारकांची शेजारील रस्त्याच्या कडेला तात्पुरती व्यवसायाची सोय केली जाणार आहे.

Web Title: The merchandise package will be at the place of chicken bazaar