CoronaVirus Lockdown : लॉकडाऊनचे काऊंटडाऊन सुरू : सर्वत्र भयाण शांतता कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2020 02:11 PM2020-04-06T14:11:57+5:302020-04-06T14:14:30+5:30

लॉकडाऊन पुढील मंगळवारी (दि. १४) उठणार की नाही, याबाबत संदिग्धता कायम आहे; पण लोकांकडून आतापासून काऊंटडाऊन सुरू झाले आहे. सर्वत्र भयाण शांतता असली तरी पोटातील आग शमविण्याची चिंता दिवसागणिक जास्त गडद होताना दिसत आहे. प्रशासनाने कितीही कठोर पावले उचलली तरी नजरा चुकवून रोजची चूल पेटविण्याइतपत तरी पैसे मिळतील म्हणून पडेल ती कामे करण्यास लोकांनी सुरुवात केली आहे.

Lockdown countdown begins: Great peace prevails everywhere | CoronaVirus Lockdown : लॉकडाऊनचे काऊंटडाऊन सुरू : सर्वत्र भयाण शांतता कायम

लॉकडाऊनचे बारा दिवस सरले, घरातही आता खायला काही नाही उरले; मग आज चूल कशी पेटवायची, या चिंतेने नागरिक ग्रासले आहेत. आठवडा घरात बसून काढला; पण आता पोटाची आग स्वस्थ बसू देत नसल्याने या आजीबार्इंनी कोल्हापुरातील आयर्विन ख्रिश्चन हायस्कूलच्या कंपौंडसमोर कडधान्यांच्या मोडांची विक्री सुरू केली. (छाया : अमर कांबळे)

googlenewsNext
ठळक मुद्देलॉकडाऊनचे काऊंटडाऊन सुरू : सर्वत्र भयाण शांतता कायमचिंता दाटली, जगण्यासाठी धडपड वाढली

कोल्हापूर : लॉकडाऊन पुढील मंगळवारी (दि. १४) उठणार की नाही, याबाबत संदिग्धता कायम आहे; पण लोकांकडून आतापासून काऊंटडाऊन सुरू झाले आहे. सर्वत्र भयाण शांतता असली तरी पोटातील आग शमविण्याची चिंता दिवसागणिक जास्त गडद होताना दिसत आहे. प्रशासनाने कितीही कठोर पावले उचलली तरी नजरा चुकवून रोजची चूल पेटविण्याइतपत तरी पैसे मिळतील म्हणून पडेल ती कामे करण्यास लोकांनी सुरुवात केली आहे.

देशभर जाहीर झालेल्या २१ दिवसांच्या लॉकडाऊनचा रविवारी १२ वा दिवस होता. कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून पोलीस आणि प्रशासनाने कडक निर्बंध लादले. संसर्गाच्या भीतीने आणि कारवाईच्या दंडुक्यामुळे आठवडाभर लोक घरात राहिले; पण ज्यांचे हातावरचे पोट आहे, त्यांची मात्र पंचाईत झाली आहे.

किरकोळ वस्तू व पदार्थांची विक्री करून कुटुंबाचे पोट भरणाऱ्यांची परिस्थिती तर अधिकच बिकट झाली आहे. आठवडा कसा तरी निघाला आणि अजून पुढचे दहा दिवस कसे काढायचे याची चिंता त्यांच्यासमोर आहे. त्यातूनच ते पुन्हा घराबाहेर पडू लागले आहेत. एकदाचा कोरोना विषाणू परवडला; पण पोटातील भुकेचा विषाणू सहन होत नसल्याने आजची चूल पेटविण्याइतपत तरी पैसे मिळतील, या आशेने कोपºयाकोपºयावर बसून फळे, भाज्यांसह किरकोळ खाद्यपदार्थांची विक्री करण्यास सुरुवात केली आहे. प्रशासनाने कितीही विरोध केला तरी ते कोणाला जुमानायला तयार नाहीत.

महिन्याचा पहिला आठवडा हा पगाराचा असतो; पण सध्या लॉकडाऊनमुळे सर्व कामेच ठप्प आहेत. काम नाही तर पगारही नाही; त्यामुळे कंत्राटी कर्मचारी व छोट्या-मोठ्या उद्योगांतील कामगारांचा खिसा या महिन्याच्या सुरुवातीस रिकामाच आहे. १५ दिवस काम केल्याचे जे काही पैसे आले तेही जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीत गेले; त्यामुळे कुठेही सहज नजर टाकली तरी तरुण मुले, पुरुष भविष्याच्या चिंतेने शून्यात हरवलेले दृष्टीस पडतात.

किरकोळ दुकानदारांची चिंता वाढली

जीवनावश्यक वस्तंूची विक्री करणाऱ्या किराणा दुकानामध्ये मालाची टंचाई तीव्र होऊ लागली आहे. नवीन माल येणेच बंद झाल्याने आहे ते दुकानही बंद पडण्याच्या धास्तीने किरकोळ दुकानदारही चिंताग्रस्त झाले आहेत.

स्वयंसेवी संस्थांकडून मदतीचा हात

जगण्याची लढाई कठीण होत चालल्याने प्रशासनाच्या जोडीने आता स्वयंसेवी संस्थांनीही मदतीसाठी कंबर कसली आहे. फूड पॅकेटच्या वाटपाबरोबरच अडचणीतील कुटुंबांची माहिती घेऊन जीवनावश्यक वस्तूचे किट पोहोचविले जाऊ लागले आहे. या अडचणीच्या काळात या संस्थांचाच एकमेव आधार जगण्याचे बळ वाढविणारा ठरत आहे.

लक्ष्मीपुरी कोंडाओळ येथे ठिकपुर्लीचे कृष्णात म्हाळुंगेकर गेली ३५ वर्षे हातगाड्यावरून मालवाहतुकीचे काम करतात. घरदार नसल्याने हमालीतून मिळणाऱ्या १००-१५० च्या कमाईतून ते रोजचा खर्च भागवितात. लॉकडाऊन झाल्यापासून रोजगार गेला, जेवणाचीही पंचाईत झाली. दुकानमालकाने दयाबुद्धीने जेवणाची सोय केली; पण काम कधी सुरू होईल, या आशेने ते रोज दुकानाच्या पायरीवर हातगाडा घेऊन येऊन बसतात. रात्र झाली जवळच पायरीवर झोपतात. त्यांच्याकडे पाहिले की गरिबांचा रोजगार गमावल्याची चिंता अधिक गडद होते.
 

 

 

Web Title: Lockdown countdown begins: Great peace prevails everywhere

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.