Kolhapur ZP Election Results 2026: कोल्हापूर जिल्हा परिषदेत महायुतीलाच गुलाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 12:13 IST2026-02-10T12:12:45+5:302026-02-10T12:13:11+5:30
नगरपालिका, महापालिकेनंतर जिल्हा परिषदेवरही महायुतीची सत्ता येणार

Kolhapur ZP Election Results 2026: कोल्हापूर जिल्हा परिषदेत महायुतीलाच गुलाल
कोल्हापूर : नगरपालिका, महापालिकेनंतर जिल्हा परिषदेवरही महायुतीची सत्ता येणार हे स्पष्ट झाले असून ६८ पैकी ५१ जागांवर महायुतीचे उमेदवार निवडून आले आहेत. सर्वाधिक २० जागा मिळवून मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी (अजित पवार)ने स्थापनेपासूनची उच्चांकी कामगिरी नोंदवली. आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली १४ जागा जिंकून काँग्रेस दुसऱ्या स्थानावर राहिली.
राष्ट्रवादी (अजित पवार)ने कागल, आजरा, चंदगड, पन्हाळा, शाहूवाडी, करवीर, राधानगरी तालुक्यातून २० उमेदवार निवडून आणत प्रामुख्याने भाजप आणि आमदार विनय कोरे यांच्या जनसुराज्य पक्षाला धक्का दिला आहे. तर काँग्रेसने गगनबावडा, हातकणंगले, राधानगरी आणि करवीर तालुक्यातून विजय संपादन केला. या निवडणुकीत पालकमंत्री प्रकाश आबिटकर, जनसुराज्यचे आमदार विनय काेरे, भाजपचे आमदार शिवाजीराव पाटील, शिंदेसेनेचे आमदार चंद्रदीप नरके यांना त्यांच्या मतदारसंघात पराभवाचा मोठा फटका बसला.
बाराही तालुक्यांत कुठेही महायुतीच्या घटक पक्षातील सर्वजण एकत्र येऊन निवडणूक लढवत आहेत असे घडले नाही. उलट कधी नव्हे ते राष्ट्रवादी आणि भाजपनेही पन्हाळा तालुक्यात जनसुराज्य शक्ती पक्षाविरोधात उमेदवार उभे केले होते. या निवडणुकीमुळे प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील नेत्यांची ताकद स्पष्ट झाली असून सत्तेमधील मंत्री, आमदारांनाही फटका बसल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. गेल्यावेळच्या तुलनेत राष्ट्रवादी वगळता भाजप, शिंदेसेना, जनसुराज्य, स्वाभिमानी यांना काही जागांचा फटका बसला असून काँग्रेसने गतवेळी असलेल्या १४ इतक्याच जागा यंदाही जिंकल्या आहेत.
जिल्हा परिषदेतील बलाबल
एकूण जागा - ६८
- राष्ट्रवादी (अजित पवार) -२०
- काँग्रेस : १४
- भाजप : १२
- शिंदेसेना : ०९
- जनसुराज्य : ०५
- यड्रावकर शाहू आघाडी : ०४
- उद्धवसेना : ०१
- स्वाभिमानी : ०१
- भुदरगड शिवशाहू आघाडी-०१
- अपक्ष : ०१
पंचायत समिती यांच्या ताब्यात
१ चंदगड : राष्ट्रवादी (अजित पवार)
२आजऱा : राष्ट्रवादी (अजित पवार)
३ गडहिंग्लज : राष्ट्रवादी (अजित पवार)
४ कागल : मुश्रीफ व दोन घाटगे
५ भुदरगड : आबिटकर-भाजप
६ पन्हाळा : चंद्रदीप नरके व बाबासाहेब पाटील आसुर्लेकर
७. शाहूवाडी : जनुसराज्य चार, सत्यजित-मानसिंगराव प्रत्येकी दोन
८ करवीर : राहुल पाटील व अमल महाडिक
९ हातकणंगले : भाजप
१० शिरोळ : यड्रावकर यांची शाहू आघाडी
११ राधानगरी : काँग्रेस
१२ गगनबावडा : काँग्रेस
१२ पैकी १० पंचायत समित्या महायुतीकडे
जिल्ह्यातील १२ पैकी १० पंचायत समित्यांवर महायुतीची सत्ता येणार आहे. राधानगरी आणि गगनबावडा पंचायत समितीवर काँग्रेसचे वर्चस्व राहणार आहे. उर्वरित दहाही ठिकाणी महायुतीचीच सत्ता राहणार आहे.