कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडी उद्या होणार; सत्तेचा फार्म्युला कसा...जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 12:24 IST2026-03-16T12:24:13+5:302026-03-16T12:24:45+5:30
पाच वर्षांत २८ सदस्यांना संधी

कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडी उद्या होणार; सत्तेचा फार्म्युला कसा...जाणून घ्या
कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदावरून गेले पंधरा-वीस दिवस निर्माण झालेला पेच अखेर संपला आहे. रविवारी विमानतळावर महायुतीच्या प्रमुख नेत्यांच्या झालेल्या बैठकीत अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडे, तर उपाध्यक्षपद भाजपकडे देण्याचा निर्णय झाला. दोन्ही पदे सव्वा वर्षाला तर सभापतीपद मात्र वर्षाला बदलले जाणार आहे. अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीकडून शैलजा पाटील, शोभा फराकटे, तर उपाध्यक्षपदासाठी भाजपकडून तानाजी पाटील यांची नावे चर्चेत आहेत.
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत जिल्ह्यात ६८ पैकी तब्बल ५१ जागा महायुतीच्या निवडून आल्या आहेत. त्यात सर्वाधिक २० जागा राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या आहेत. त्यामुळे अध्यक्ष पदावर राष्ट्रवादीने दावा केला आहे. मात्र, भाजप-जनसुराज्य पक्षानेही आपणालाच अध्यक्षपद मिळावे, यासाठी राजकीय ताकद वापरण्यास सुरुवात केल्याने, महायुतीमध्ये काहीसा तणाव निर्माण झाला होता. अध्यक्ष निवड दोन दिवसांवर आली, तरी गुंता सुटत नव्हता.
अखेर, रविवारी विमानतळावर वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री प्रकाश आबीटकर, खासदार धैर्यशील माने, आमदार विनय कोरे, आमदार चंद्रदीप नरके, आमदार अमल महाडिक, आमदार राजेश क्षीरसागर, माजी आमदार डॉ.सुजीत मिणचेकर, प्रा.जयंत पाटील, जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समीत कदम यांची बैठक झाली. यामध्ये अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी सव्वा-सव्वा वर्षाचा फार्म्युला निश्चित करण्यात आला. त्यानंतर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगण्यात आला.
महायुतीचे सदस्य आज पन्हाळ्यावर
उद्या, मंगळवारी अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडी होत आहे. त्यामुळे आज, सोमवारी महायुतीच्या ५१ सदस्यांना पन्हाळ्यावर एकत्रित केले जाणार आहे. तेथूनच अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीसाठी जाणार असल्याचे समजते.
असे आहे बलाबल...
- राष्ट्रवादी : २०
- भाजप : १२
- शिंदेसेना : ०९
- जनसुराज्य : ०५
- शाहू आघाडी : ०४
- अपक्ष : ०१
- काँग्रेस : १५
- उद्धवसेना : ०१
- स्वाभिमानी संघटना : ०१
पाच वर्षांत २८ सदस्यांना संधी
पाच वर्षांत चार अध्यक्ष व उपाध्यक्ष तर २० विषय समिती सभापती होणार आहेत. त्यामुळे महायुतीच्या ५१ पैकी २८ सदस्यांना पदाची संधी मिळणार आहे.
असा ठरला सत्तेचा फार्म्युला
- अध्यक्ष : राष्ट्रवादी
- उपाध्यक्ष : भाजप
- सभापती : शिंदेसेना, जनसुराज्य, शाहू आघाडी