प्राथमिक आरोग्य केंद्रातील नोकर भरतीत आर्थिक व्यवहाराच्या तक्रारी
By भीमगोंड देसाई | Updated: April 29, 2026 13:17 IST2026-04-29T13:17:59+5:302026-04-29T13:17:59+5:30
जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रारी, भरती प्रक्रिया बेकायदेशीर, गुपचूप झाल्याचा आरोप

प्राथमिक आरोग्य केंद्रातील नोकर भरतीत आर्थिक व्यवहाराच्या तक्रारी
कोल्हापूर : दीड वर्षापूर्वी सुरु झालेल्या जिल्ह्यातील दहा प्राथमिक आरोग्य केंद्रात खासगी कंपनीतर्फे झालेल्या नोकरभरती प्रक्रियेत उमेदवारांकडून आर्थिक व्यवहार झाल्याच्या तक्रारी आहेत. कंपनीसंबंधी जिल्हा परिषद सदस्यांकडे विविध तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. काही सदस्यांनी त्या कंपनीच्या चौकशीची मागणी केली आहे. त्यामुळे सर्व सदस्यांना विश्वासात घेतल्याशिवाय भरती प्रक्रिया राबवू नये, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य अभिजित तायोटे यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुद्ध पिंपळे यांच्याकडे लेखी केली आहे. कंपनीने उमेदवारांची निवड करताना निकष पाळलेले नाहीत, अशी लेखी तक्रार जि.प. सदस्य सागर धुंदरे यांनी केली आहे.
जिल्ह्यात दीड वर्षापूर्वी दहा नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र सुरु झाली आहेत. मात्र, येथे कायमस्वरूपी आरोग्य कर्मचारी नियुक्त नसल्याने अतिरिक्त कार्यभारावर कामकाज केले जात होते. दरम्यान येथील रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून शासनाने कंपनीतर्फे कंत्राटी पद्धतीने ११ महिन्यांच्या मुदतीत आरोग्य कर्मचारी भरतीचा निर्णय घेतला. पुण्यातील कंपनीने कर्मचारी भरतीची प्रक्रिया राबवली.
पदनिहाय पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणीची प्रक्रिया सुरु आहे. याच टप्यात भरतीची प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने झालेली आहे, पारदर्शकपणे प्रक्रिया राबवली नसल्याच्या तक्रारी सदस्यांनी केल्या आहेत. त्याला आरोग्य अधिकाऱ्यांनीही अधिकृत दुजोरा दिला आहे. परिणामी भरती प्रक्रिया वादात सापडली आहे.
जिल्ह्यातील दहा प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य कर्मचारी नव्हते, त्यामुळे रुग्णांची गैरसोय होत होती. त्यामुळे शासनाने नियुक्त केलेल्या कंपनीतर्फे कंत्राटी तत्त्वावर नोकरभरती केली आहे. यासंबंधी काही सदस्यांच्या तक्रारी आहेत. - अनिरुद्ध पिंपळे, जिल्हा आरोग्य अधिकारी, कोल्हापूर
कंपनीने नोकरभरती बेकायदेशीर, गुपचूपपणे केली आहे. ज्या कंपनीने भरतीची प्रक्रिया राबविली आहे, त्या कंपनीचे कोणतेही रेकॉर्ड गुगलवर सापडत नाही. लेटर हेडवर कंपनीचा रजिस्ट्रेशन आणि जीएसटी नंबर नाही. - सागर धुंदरे, सदस्य, कोल्हापूर
या आरोग्य केंद्रात भरती होणार
राधानगरी : ओलवण, म्हासुर्ले, तुरंबे , बिद्री
शिरोळ : कवठेगुलंद
पन्हाळा : पोर्ले
करवीर : आरळे
भुदरगड: मडूर
चंदगड : राजगोळी
हातकणंगले : कुंभोज
कोणत्या पदावर किती जणांची भरती
आरोग्य सहाय्यक पुरुष १
प्रयोगशाला तंत्रज्ञ ५
औषध निर्माता ७
कनिष्ठ लिपिक ९
परिचर २२