पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यात खरीप काढणी थंडावली, आगामी दोन दिवस पावसाचेच
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2025 15:58 IST2025-10-25T15:58:24+5:302025-10-25T15:58:41+5:30
ऐन सणासुदीत पाऊस पडल्याने दिवाळीचा काही प्रमाणात बेरंग झाला

पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यात खरीप काढणी थंडावली, आगामी दोन दिवस पावसाचेच
कोल्हापूर : जिल्ह्यात शुक्रवारी दुपारनंतर जोरदार पाऊस झाला. बहुतांशी तालुक्यात मध्यम ते जोरदार पाऊस कोसळल्याने खरीप काढणी काहीसी थंडावली आहे. शिवारात पाणी झाल्याने विशेषता भाताची कापणी आणि मळणी करता येत नाही. आगामी दोन दिवस पावसाचे राहतील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. ऐन सणासुदीत पाऊस पडल्याने दिवाळीचा काही प्रमाणात बेरंग झाला.
गेल्या चार-पाच दिवसांपासून जिल्ह्यात पावसाळी वातावरण आहे. गुरुवारी रात्री अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. शुक्रवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण राहिले. दुपारनंतर पावसाने सुरुवात केली. कोल्हापूर शहरात पावणे दोनच्या सुमारास पाऊस सुरू झाला. काही वेळ जोरदार सरी कोसळल्या. त्यानंतर, भुरभुर राहिली. या पावसाने खरीप काढणीला फटका बसला आहे.
जिल्ह्याच्या पश्चिमेकडील तालुक्यांमध्ये खरिपाची काढणीची धांदल सुरू आहे. भात, नागली, भुईमुगाच्या काढणीला या पावसाने फटका बसला आहे. काही तालुक्यांत खरीप ज्वारीही काढणीस आली असून, कणसांमध्ये पाणी पडल्याने दाणे काळे पडण्याचा धोका अधिक असतो. शिवारात पाणी असल्याने भाताची कापणी करता येईना. कापणी केली, तर मळणी कोठे करायची, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.
गुऱ्हाळघरांचेही नुकसान
जिल्ह्यात गुऱ्हाळघरांनी गती घेतली आहे. पावसामुळे जळण भिजत असून, ऊस तोडणीही करता येत नाही. खराब हवामानाचा गुळाच्या प्रतीवरही परिणाम होत आहे.