थेट पाईपलाईन योजनेस जानेवारी २०२२ ची डेडलाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 07:55 PM2021-06-11T19:55:37+5:302021-06-11T19:58:49+5:30

water scarcity Kolhapur : कोल्हापूर शहराची पुढील पंचवीस वर्षांची पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेऊन राबविण्यात येत असलेल्या काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेचे काम जानेवारी २०२२ अखेरपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी शुक्रवारी ठेकेदारासह सर्व संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

January 2022 deadline for direct pipeline scheme | थेट पाईपलाईन योजनेस जानेवारी २०२२ ची डेडलाईन

कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी शुक्रवारी काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेच्या कामाची शुक्रवारी धरणक्षेत्रात जाऊन पाहणी केली, तसेच संबंधित सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कामाबाबत सूचना केल्या. यावेळी आमदार ऋतुराज पाटील, महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, माजी महापौर निलोफर आजरेकर, माजी उपमहापौर संजय मोहिते यांच्यासह जलसंपदा, महावितरण विभागाचे अधिकारी उपस्थित होते. (छाया : आदित्य वेल्हाळ)

Next
ठळक मुद्देथेट पाईपलाईन योजनेस जानेवारी २०२२ ची डेडलाईन पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडून पाहणी, अधिकाऱ्यांची बैठक

कोल्हापूर : कोल्हापूर शहराची पुढील पंचवीस वर्षांची पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेऊन राबविण्यात येत असलेल्या काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेचे काम जानेवारी २०२२ अखेरपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी शुक्रवारी ठेकेदारासह सर्व संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

काम करताना येत असलेल्या अडचणी आणि योजना लवकर पूर्ण करण्याचे बंधन लक्षात घेऊन धरणक्षेत्रातील कोणत्या कामांना किती प्राधान्य द्यायचे, ती कामे किती वेळेत पूर्ण करायची, याचा बारचार्ट तयार करून प्रत्येक आठवड्याला कामाचा आढावा महापालिका प्रशासकांनी घ्यावा, अशा सूचनाही पालकमंत्री पाटील यांनी या वेळी दिल्या.

पालकमंत्री पाटील यांनी योजनेचे प्रमुख ठेकेदार, सल्लागार, महापालिका, जलसंपदा, महावितरण अधिकारी यांना सोबत घेऊन प्रत्यक्ष धरणक्षेत्रात जाऊन शुक्रवारी योजनेच्या कामापैकी जॅकवेल, इंटेकवेल, इन्स्पेक्शनवेल, कॉपरडॅम आदी कामांचा आढावा घेतला. त्यानंतर काळम्मावाडी गेस्ट हाऊसवर सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेतली. सुमारे तासभर चालेल्या या बैठकीत माजी निवृत्त अधिकारी व्ही. एस. नलवडे यांनी संबंधित सर्व अधिकाऱ्यांना कामाचा प्राधान्यक्रम, गती, तांत्रिक मुद्दे यांवर मार्गदर्शन केले.

बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना पालकमंत्री पाटील यांनी योजनेचे काम कोठेपर्यंत आले आहे आणि ते केव्हा पूर्ण होणार याची माहिती दिली.  या वेळी आमदार ऋतुराज पाटील, प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, माजी महापौर निलोफर आजरेकर, माजी उपमहापौर संजय मोहिते, प्रकल्प अभियंता हर्षजित घाटगे, माजी नगरसेवक शारंगधर देशमुख, सचिन चव्हाण, मधुकर रामाणे, अर्जुन माने, सचिन पाटील, सुनील पाटील, अशपाक आजरेकर, माजी नगरसेविका माधुरी लाड, कोल्हापूर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर, उपअभियंता भाग्यश्री पाटील, कल्याणी कालेकर, प्रशांत कांबळे, शाखा अभियंता एच. बी. कुंभार उपस्थित होते.

Web Title: January 2022 deadline for direct pipeline scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.