‘शाहूं’चा मद्रास चळवळीवर प्रभाव

By Admin | Updated: December 19, 2014 23:22 IST2014-12-19T23:12:09+5:302014-12-19T23:22:25+5:30

पद्मजा पाटील यांचे संशोधन : संदर्भ ग्रंथाचे आज प्रकाशन

Impressions of Shahu's Madras movement | ‘शाहूं’चा मद्रास चळवळीवर प्रभाव

‘शाहूं’चा मद्रास चळवळीवर प्रभाव

कोल्हापूर : छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या सामाजिक कार्याने केवळ स्थानिक किंवा राज्यस्तरीयच नव्हे, तर मद्रास प्रांतातील जस्टीस पार्टीची चळवळही प्रभावित झाली होती. संबंधित बाब सप्रमाण सिद्ध करण्यात शिवाजी विद्यापीठाच्या संशोधक डॉ. पद्मजा पाटील यांना यश आले आहे. त्याबाबतच्या संशोधनातून इतिहास अधिविभागातील डॉ. पाटील यांनी ‘अस्तित्वासाठी संघर्ष, जातिवर्चस्व आणि दक्षिणेतील ब्राह्मणेतर चळवळ : संदर्भ साधनांचा अभ्यास’ हा संदर्भग्रंथ तयार केला आहे.
या ग्रंथाचे प्रकाशन उद्या, शनिवारी शाहू सांस्कृतिक भवनातील दक्षिण भारत जैन सभेच्या ९४ व्या त्रैमासिक अधिवेशनात शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. जे. पवार यांच्या हस्ते होणार आहे. ग्रंथामध्ये डॉ. पाटील यांनी मूळ कागदपत्रांंसह अनेक उपयुक्त संदर्भ साधनांचा सर्वंकष आढावा घेतला आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने मान्य केलेल्या मेजर रिसर्च प्रोजेक्ट अंतर्गत हे संशोधन डॉ. पाटील यांनी आॅगस्ट २०११ मध्ये पूर्ण केले. या ग्रंथाबद्दल डॉ. पाटील म्हणाल्या, ब्राह्मणेतर चळवळ ही सत्यशोधक व दलित, आंबेडकरी चळवळींमधील महत्त्वपूर्ण दुवा असल्याचे ग्रंथात प्रथमच सिद्ध केले आहे. एकूण पाच प्रकरणांत ग्रंथ विभागला आहे. त्यात उद्दिष्ट्ये व लेखनपद्धती, मुंबई व मद्रास इलाख्यातील ब्राह्मणेतर चळवळीचा साद्यंत इतिहास, तसेच संदर्भ साधनांची चर्चा केली आहे. त्यामध्ये दिल्ली, चेन्नई, केरळ, कोलकता येथील प्रमुख पुराभिलेखागारांमधील मूळ संदर्भ साधने, तसेच खासगी संग्रहालयातील कागदपत्रांचा आढावा घेतला आहे. तमिळ, मल्याळी, कन्नड, तेलगू संदर्भसाहित्य इंग्रजीमध्ये भाषांतरित करण्यासाठी ए. चंद्रशेखरन, मोहंमद कोया, जी. प्रेमकुमार यांचे सहकार्य लाभले आहे. तसेच राजर्षी शाहूंच्या कार्याविषयी मद्रास आणि त्रिवेंद्रम येथील वृत्तपत्रांतून आलेले संदर्भ तसेच मद्रास, महाराष्ट्रातील नेत्यांमधील पत्रव्यवहार हे ग्रंथाचे वैशिष्ट्य आहे. (प्रतिनिधी)


या संदर्भग्रंथाद्वारे डॉ. गेल आॅम्व्हेट आणि डॉ. के. के. कावळेकर यांच्या ब्राह्मणेतर चळवळी संदर्भातील संशोधनाला पद्मजा पाटील यांनी पुढे नेले आहे. त्याला सर्वंकषतेचे नवे आयाम प्राप्त करून दिले आहेत.
- प्रा. डॉ. वासंती रासम,
राज्यशास्त्र अधिविभाग

Web Title: Impressions of Shahu's Madras movement