स्वत:च्या क्षमता ओळखा, अपयशाने खचू नका

By Admin | Updated: December 19, 2014 23:36 IST2014-12-19T23:14:17+5:302014-12-19T23:36:30+5:30

गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलीस अधीक्षक दीपाली काळे : राजर्षी शाहू व्याख्यानमाला

Identify your own abilities, do not fail with failure | स्वत:च्या क्षमता ओळखा, अपयशाने खचू नका

स्वत:च्या क्षमता ओळखा, अपयशाने खचू नका

कोल्हापूर : स्पर्धा परीक्षांकडे ‘लाच न देता मिळणारी नोकरी’ या उद्देशाने पाहिले जाते. कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी प्रथम आपले ध्येय ठरवून स्वत:च्या क्षमता ओळखणे गरजेचे आहे. काहीवेळा अपयशही पदरी पडेल; पण त्यामुळे खचून न जाता प्रयत्नांत सातत्य ठेवावे, असे मार्गदर्शन गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलीस अधीक्षक दीपाली काळे यांनी केले.
महापालिकेच्या भास्करराव जाधव वाचनालयाच्यावतीने आयोजित राजर्षी शाहू व्याख्यानमालेत त्यांनी ‘स्पर्धा परीक्षा आणि व्यक्तिमत्त्व विकास’ या विषयावर व्याख्यान दिले. यावेळी महापालिकेचे मुख्य लेखापाल संजय सरनाईक, अतिरिक्त परिवहन निरीक्षक संजय भोसले उपस्थित होते.
काळे म्हणाल्या, काहीवेळा आपण आई-वडील, मित्र किंवा कुणीतरी सांगितल्यामुळे स्पर्धा परीक्षा देतो, कित्येक जणांकडून पदवी घेतल्यानंतर नोकरी लागेपर्यंतचा वेळ म्हणून अभ्यास केला जातो. मात्र, स्पर्धा परीक्षांमध्ये पाऊल ठेवताना काय करायचे आहे हे ठरविले पाहिजे. सुप्तावस्थेत असलेल्या स्वत:च्या क्षमता ओळखून त्यांचा वापर करता आला पाहिजे.
यशाला शॉर्टकट कधीच नसतो. तुम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केल्यानंतरही काहीवेळा अपयश येऊ शकते; पण त्या अपयशाने खचून न जाता प्रयत्नांत सातत्य ठेवणे गरजेचे आहे. स्वत:वर विश्वास ठेवून वेळेचे योग्य नियोजन करा. छोट्या-छोट्या चुकांकडे लक्ष द्या. पहिली संधी कधीच सोडू नका. अनेकदा ही पहिली संधीच आपल्याला यश देऊन जाते; त्यामुळे उद्या अभ्यास करूया, पुढच्या वेळी परीक्षा देऊया, असा आळस करू नका, असा सल्लाही त्यांनी दिला.
शीला पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Identify your own abilities, do not fail with failure