Kolhapur News: इंधन वाचविणार कसे ?, पेट्रोलवरच धावते ग्रामीण जीवनाची गाडी; सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा
By विश्वास पाटील | Updated: May 14, 2026 13:01 IST2026-05-14T12:58:06+5:302026-05-14T13:01:23+5:30
दोन गावांच्या सर्व्हेक्षणातून स्पष्ट

संग्रहीत छाया
विश्वास पाटील
कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचत करण्याचे आवाहन केले असले तरी पेट्रोलवरच ग्रामीण जीवनाची गाडी पळत असल्याचे चित्र दोन गावांतील सर्व्हेक्षणातून पुढे आले आहे. येथील न्यू कॉलेजमधील प्राध्यापकांनी शिरोळ तालुक्यातील तेरवाड व पन्हाळा तालुक्यातील देवठाणे येथे गतवर्षी नोव्हेंबरमध्ये हे नमुना सर्व्हेक्षण केले आहे.
सार्वजनिक वाहतूक मर्यादित असल्यामुळे वैयक्तिक वाहनांवरील अवलंबित्व झपाट्याने वाढत आहे. सांख्यिकीय अभ्यासानुसार दोन्ही गावांमध्ये दरमहा प्रति व्यक्ती सुमारे २०७ मेगाजूल इतकी ऊर्जा वाहनांसाठी वापरली जात असल्याचे आढळले आहे. प्रति कुटुंब वाहनांसाठी वापरली जाणारी ऊर्जा तेरवाडमध्ये सुमारे ९६२ मेगाजूल, तर देवठाणेमध्ये सुमारे १०१२ मेगाजूल इतकी असल्याचेही दिसून आले आहे.
न्यू कॉलेजच्या संख्याशास्त्र विभागातील प्राध्यापक डॉ. दादासाहेब गोडसे आणि विद्यार्थी वैभवी पाटील, श्वेता बराले, वैष्णवी दाभोलकर आणि संकल्प भुयेकर यांनी केलेल्या अभ्यासात तेरवाड येथील १०८० पैकी ६०० आणि देवठाणे येथील २२५ पैकी १९० घरांची ‘सिंपल रँडम सॅम्पलिंग या संख्याशास्त्रीय प्रणालीच्या माध्यमातून निवड करून सर्वेक्षण करण्यात आले. तेरवाड व देवठाणे या दोन गावांमधील दरमहा प्रति कुटुंब आणि प्रति व्यक्ती लागणारे इंधन याचे प्रमाण काढण्यात आले.
प्रति व्यक्ती आणि प्रति कुटुंब मासिक इंधन वापराच्या आकडेवारीतून ग्रामीण भागातील वाहनांवरील वाढते अवलंबित्व स्पष्टपणे दिसून येते. तेरवाडमध्ये प्रति व्यक्ती ४.९० लिटर तर देवठाणेमध्ये ५.०१ लिटर पेट्रोलचा वापर होत असून, दर व्यक्ती महिन्याला सरासरी सुमारे ५ लिटर पेट्रोल खर्च होत आहे. त्याचप्रमाणे प्रति कुटुंब पेट्रोलचा वापर तेरवाडमध्ये २२.७० लिटर आणि देवठाणेमध्ये २४.४८ लिटर इतका नोंदवला गेला आहे.
डिझेलचा वापरही देवठाणेमध्ये प्रति व्यक्ती (०.८५ लिटर) आणि प्रति कुटुंब (४.१८ लिटर) हा तेरवाडपेक्षा जास्त आहे. सीएनजीचा वापर तेरवाडमध्ये मर्यादित प्रमाणात (प्रति व्यक्ती ०.३४ किलो व प्रति कुटुंब १.५७ किलो) दिसून येतो. देवठाणेमध्ये तो जवळजवळ शून्य आहे. इलेक्ट्रिक वाहनांसाठी विजेचा वापर देवठाणेमध्ये प्रति व्यक्ती (०.७६ kWh) आणि प्रति कुटुंब (३.७१ kWh) या दोन्ही स्तरांवर तेरवाडपेक्षा अधिक असल्याने तेथे पर्यायी ऊर्जेचा काही प्रमाणात स्वीकार केल्याचे दिसत आहे.
प्रति व्यक्ती सरासरी मासिक इंधन वापर
इंधन प्रकार तेरवाड- देवठाणे
- पेट्रोल ४.९० : ५.०१ लिटर
- डिझेल ०.५७ : ०.८५ लिटर
- सीएनजी ०.३४ : ०.०० किलो
- वीज (इलेक्ट्रिक वाहनांसाठी) ०.२५ : ०.७६ किलोवॅट तास
ग्रामीण भागातील वाहतूक व्यवस्था अजूनही मोठ्या प्रमाणावर पारंपरिक जीवाश्म इंधनांवर अवलंबून असल्याचे या अभ्यासातून स्पष्ट होते. -डॉ. दादासाहेब गोडसे, सहायक प्राध्यापक, न्यू कॉलेज कोल्हापूर