साताऱ्यातील अधिकारी कोल्हापूरच्या कारखान्यांचे काटे तपासतात कसे?, चौकशीचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2025 15:34 IST2025-11-22T15:33:44+5:302025-11-22T15:34:11+5:30
साखर आयुक्तांच्या बैठकीत केला पर्दाफास : एफआरपी थकवणाऱ्या १३ कारखान्यांवर दोन दिवसात कारवाई

साताऱ्यातील अधिकारी कोल्हापूरच्या कारखान्यांचे काटे तपासतात कसे?, चौकशीचे आदेश
कोल्हापूर : सातारा जिल्ह्यातील वैधमापन शास्त्र विभागाचे सहायक नियंत्रक ज्योती पाटील व सहायक निरीक्षक योगेश आग्रवाल हे कोल्हापुरातील तीन साखर कारखान्यांच्या काट्यांची तपासणी कसे करतात? त्यांना कोणी अधिकार दिला? अशी विचारणा करत स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड व शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांच्या समोरच पुण्यातील बैठकीत पर्दाफाश केला. मागील हंगामातील एफआरपी थकवणाऱ्या विभागातील १३ कारखान्यांची सुनावणी पूर्ण होऊन दोन दिवसांत कारवाईचे आदेश देऊ, अशी ग्वाही डॉ. कोलते यांनी दिली.
मागील हंगामातील एफआरपीप्रमाणे पैसे, ऊस तोडणी व वाहतूक आकारणी, वजन काट्यातील तफावत आदी मुद्यांवर चर्चा करण्यासाठी शुक्रवारी पुण्यात आयुक्त कार्यालयात बैठक झाली.
भरारी पथकांनी आतापर्यंत किती काटे तपासले? अशी विचारणा स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष रूपेश पाटील यांनी केली. यावर, कोल्हापूरचे उपनियंत्रक दत्तात्रय पोवार म्हणाले, भरारी पथकाची जिल्हाधिकाऱ्यांनी स्थापना केली आहे; पण अद्याप आम्हाला पत्र आले नसल्याने आम्ही तपासणी केलेली नाही. यावर, रूपेश पाटील यांनी थेट सहायक निरीक्षक योगेश आग्रवाल यांना फोन लावून तुम्ही तपासणीला कसे गेला? अशी विचारणा केली.
यावर, पुणे विभागीय कार्यालयातून सांगितल्याने गेल्याचे संबधित अधिकाऱ्यांनी सांगितले. स्थानिक भरारी पथकाला न कळवता असे करता येत नसून संबंधित प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. विभागीय साखर सहसंचालक संगीता डोंगरे, उपसंचालक गोपाळ मावळे, प्रा. जालंदर पाटील, सावकर मादनाईक, बाबासाहेब देवकर, भगवान काटे आदी उपस्थित होते.
उपपदार्थ निर्मिती परवाने रद्द करा
एकाही उपपदार्थाची निर्मिती न करणाऱ्या ‘भोगावती’ कारखाना सर्वाधिक दर देत असेल तर मग उपपदार्थांचा फायदा शेतकऱ्यांना काय? अशी विचारणा जय शिवराय संघटनेचे अध्यक्ष शिवाजी माने यांनी केली. यावर, परवानगीचा अधिकार केंद्र सरकारला असून शेतकऱ्यांच्या भावना कळवू, असे आयुक्तांनी सांगितले.
दंड कारखान्याकडून नव्हे संचालकांकडून वसूल करा
विविध कारणांवरून आकारण्यात येणारा दंड कारखान्यांकडून न घेता संचालक व अधिकाऱ्यांकडून वसूल करावा. इंदलकर समितीच्या शिफारसीनुसार कर्मचाऱ्यांची संख्या निश्चित करा, हार्वेस्टिंगने तोडलेल्या उसावर मुंडे महामंडळासाठी कपात करू नये या मागण्या केल्या.
काट्याला लावलेले कॉम्प्युटर काढणार
वजन काट्याला जोडलेले कॉम्प्युटर काढणार असून भरारी पथकामध्ये ‘आयटी’ इंजिनिअरची नियुक्ती करण्याबाबत गांभीर्याने विचार करणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.