ऐन उन्हाळ्यात हुडहुडी; कोल्हापुरातील पन्हाळगडावर पसरली धुक्याची चादर, पारा घसरला १० अंशांवर-video
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2026 12:09 IST2026-05-19T12:09:32+5:302026-05-19T12:09:49+5:30
निसर्गाचा चमत्कार, पन्हाळ्यावर जणू काश्मीर अवतरल्याचा भास

ऐन उन्हाळ्यात हुडहुडी; कोल्हापुरातील पन्हाळगडावर पसरली धुक्याची चादर, पारा घसरला १० अंशांवर-video
नितीन भगवान
पन्हाळा: ऐतिहासिक पन्हाळगडावर निसर्गाचा एक अत्यंत विस्मयकारक आणि अनाकलनीय चमत्कार आज, मंगळवारी पहाटे पाहायला मिळाला. दिवसभर ३९ अंश सेल्सिअस तापमानाने होरपळणाऱ्या गडवासीयांनी रात्री चक्क हुडहुडी भरणाऱ्या कडाक्याच्या थंडीचा अनुभव घेतला. रात्री नऊनंतर तापमानाचा पारा अचानक घसरून थेट १० अंशांवर आल्याने भर उन्हाळ्यात पन्हाळ्यावर जणू काश्मीर अवतरल्याचा भास होत होता. पन्हाळ गडावर धुक्याची चादर आणी थंडी यामुळे पन्हाळा वासीयांसह पर्यटक अनोखा अनुभव अनुभवत होते.
सध्या संपूर्ण राज्य उन्हाच्या झळांनी होरपळत असताना पन्हाळ्यावरही सोमवारी सकाळपासूनच प्रचंड उकाडा जाणवत होता. दुपारच्या वेळी पारा ३९ अंशांवर पोहोचल्याने नागरिक घामाघूम झाले होते. मात्र, सूर्यास्त झाल्यानंतर वातावरणात निसर्गाने अनपेक्षित वळण घेतले. रात्री नऊ वाजेपर्यंत स्थिर असलेले तापमान अचानक वेगाने खाली येऊ लागले. मध्यरात्रीपर्यंत हवेत इतका गारठा निर्माण झाला की, नागरिकांना कपाटात जपून ठेवलेली उबदार कपडे, स्वेटर्स आणि रजया पुन्हा बाहेर काढाव्या लागल्या.
विशेष म्हणजे, पन्हाळ्याचे तापमान उन्हाळ्यातही रात्रीच्या वेळी साधारण २० अंशांच्या खाली जात नाही. मात्र, उन्हाळ्याच्या ऐन भरात तापमान १० अंशांपर्यंत खाली येण्याची ही अत्यंत दुर्मिळ घटना आहे. असा प्रकार आयुष्यात कधीच घडला नसल्याचे अनेक ज्येष्ठ नागरिकांनी सांगितले. निसर्गाच्या या लहरीपणामुळे गडावर मुक्कामी असलेल्या पर्यटकांना बोचऱ्या थंडीचा अनुभव घेता आला असला, तरी अचानक झालेल्या या टोकाच्या हवामान बदलामुळे स्थानिकांमध्ये मात्र आश्चर्याची चर्चा सुरू आहे.