कोल्हापूर शहरात अनेक घरातून पूराचे पाणी; अडकलेल्या नागरीकांना सुरक्षित ठिकाणी हलविले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2021 03:05 PM2021-07-22T15:05:04+5:302021-07-22T15:11:50+5:30

पंचगंगा नदीला पूर आल्यामुळे जयंती नाल्यातील पाणीच्या प्रवाह थांबला आहे.

Flood water from many houses in Kolhapur city; Trapped civilians were evacuated | कोल्हापूर शहरात अनेक घरातून पूराचे पाणी; अडकलेल्या नागरीकांना सुरक्षित ठिकाणी हलविले

कोल्हापूर शहरात अनेक घरातून पूराचे पाणी; अडकलेल्या नागरीकांना सुरक्षित ठिकाणी हलविले

googlenewsNext

कोल्हापूर : कोल्हापूर शहरात गेल्या दोन दिवसापासून सुरु असलेल्या तुफान पावसामुळे रामानंदनगर, सुतारवाडा, शाहूपुरी कुंभारगल्ली, मुक्त सैनिक वसाहत येथील अनेक घरात पुराचे पाणी शिरल्याने शहरवासियांची एकच तारांबळ उडाली. महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पथकांसह अग्निशमन दलांनी तात्काळ धाव घेऊन घरात अडकलेल्या नागरीकांना सुरक्षीत ठिकाणी हलविले.

पंचगंगा नदीला पूर आल्यामुळे जयंती नाल्यातील पाणीच्या प्रवाह थांबला आहे. त्यातच रात्रभर कोसळणाऱ्या तुफान पावसाने कळंबा तलवा काठोकाठ भरला आणि त्यातील पाणी सांडव्यावरुन वेगाने बाहेर पडले. त्यामुळे रामानंदनगर पुलावर पाणी आले. तसेच रामानंद नगरातील शंभरहून अधिक घरात पाणी शिरले. पहाटेच्या वेळी अचानक पाण्याची पातळी वाढल्याने घरातील नागरीकांनी पहिल्या माळ्यावर धाव घेतली.

अग्निशमन दलाची पथके तेथे पोहचली, त्यांनी नागरीकांना घरातून बाहेर पडण्याचे आवाहन केले. पण नागरीकांनी घरातून बाहेर पडण्यास नकार दिला. दरम्यान त्याठिकाणी आमदार ऋतुराज पाटील, माजी नगरसेवक मधुकर रामाणे पोहचले. त्यांनी अग्निशमन दलाची बोट घेऊन जाऊन नागरीकांना बाहेर पडण्याची विनंती केली. पाण्याची पातळी आणखी वाढण्याअगोदर बाहेर पडा अशी विनंती करताच नागरीकांनी बाहेर पडण्यास सहमती दिली. जवळपास पन्नास घरातील नागरीकांना बोटीतून बाहेर काढण्यात आले.

शहरातील शाहुपूरी कुंभार गल्ली, सहावी गल्ली परिसरातील बऱ्याच घरातून पाणी शिरले. नागरीकांनी स्वत:हून घरातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. काही कुटुंबांनी केलेल्या गणेश मूर्ती सुध्दा सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आली. पुराच्या पाण्याने वेढल्यामुळे सहाव्या गल्लीतील सर्वच दुकाने बंद ठेवण्यात आली. सुतारवाडा नागरी वस्तीत पाणी शिरले. तेथील सर्वच कुटुंबांना नजिकच्या चित्रदूर्ग मठात स्थलांतर करण्यात आले. मुक्त सैनिक वसाहत परिसरातही अनेक घरांच्या उंबऱ्यांपर्यं पाणी पोहचले आहे. रस्ते पाण्यात बुडाले आहेत. त्याठिकाणी आमदार चंद्रकांत जाधव यांनी भेट देऊन पाहणी केली.

शहरावर पुराचे संकट ओढवल्यामुळे महापालिका यंत्रणा सक्रिय झाली. प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, अतिरीक्त आयुक्त नितीन देसाई, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, मुख्य अग्निशमन अधिकारी रणजित चिले, उप मुख्य अग्निशमन अधिकारी तानाजी कवाळे, सहायक अधिकारी मनिष रणभिसे यांनी तात्काळ पूराचे पाणी शिरलेल्या नागरी वस्तींना भेटी दिल्या आणि नागरीकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे काम सुरु केले.

Web Title: Flood water from many houses in Kolhapur city; Trapped civilians were evacuated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.