एक्झॉस्ट फॅनपासून सिक्युरिटीपर्यंत

By Admin | Updated: December 16, 2014 23:59 IST2014-12-16T23:58:29+5:302014-12-16T23:59:22+5:30

४० वे शहरस्तरीय प्रदर्शन : बालवैज्ञानिकांच्या संशोधनाचा आविष्कार

From Exst Fan to Security | एक्झॉस्ट फॅनपासून सिक्युरिटीपर्यंत

एक्झॉस्ट फॅनपासून सिक्युरिटीपर्यंत

कोल्हापूर : जिल्हा परिषद शिक्षण विभाग, शहर विज्ञान समिती आणि नेहरू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज यांच्यातर्फे ४० व्या शहरस्तरीय विज्ञान प्रदर्शनाला मुस्लिम बोर्डिंग येथील नेहरू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये आज, मंगळवारी प्रारंभ झाला. चिरंतन विश्वासाठी गणित आणि विज्ञान या संकल्पना हा प्रदर्शनाचा मुख्य विषय असून, या प्रदर्शनाचे उद्घाटन कोल्हापूर एस़एस़ सी़ बोर्डाचे विभागीय सचिव शरद गोसावी व जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी मुस्लिम बोर्डिंगचे अध्यक्ष गणी आजरेकर होते.
या प्रदर्शनात जैविक आणि अजैविक वस्तूंचा पुनर्वापर करून तयार करण्यात येणाऱ्या विविध वस्तू, एक्झॉस्ट फॅनद्वारे तेलाच्या डब्याचा एसीसारखा वापर, फौंड्री आणि कारखान्यातील राख, चुना, वाळू आणि पाण्यापासून तयार केलेल्या विटा, बिसलरीच्या कॅपपासून तयार केलेले घड्याळ आणि प्लास्टिकच्या वस्तूपासून तयार केलेल्या विविध वस्तू, कायनेटिक ऊर्जेद्वारे शेतीसाठी पाणी खेचणारे मशीन, वायरलेस रोबोट ही प्रदर्शनाची वैशिष्ट्ये आहेत.
वीजचोरीची माहिती वीज उपकेंद्राला देणारी कंट्रोल रूम, कचरा वर्गीकरणाचे मॉडेल, औद्योगिक वसाहतीमधून येणाऱ्या सांडपाण्याचा बागेसाठी वापर, पर्यावरणपूरक घोषणा आणि चोरीला आळा घालण्यासाठी तयार भिंतींवर बसवण्यात येणाऱ्या डिजिटल सायरनची मॉडेल बालवैज्ञानिकांच्या कल्पनाशक्तीची आणि पर्यावरणभानाची अनुभूतीच देत आहेत. हे प्रदर्शन गुरुवार (दि. १८) पर्यंत सुरू राहणार आहे.
प्रमुख पाहुणे शरद गोसावी यांनी, विज्ञान प्रदर्शने ही केवळ प्रतिकृती उभारणारी नसावीत. या प्रदर्शनातून विद्यार्थ्यांच्या संशोधक वृत्तीला चालना मिळाली पाहिजे, भावी संशोधक घडले पाहिजेत, छोट्या-छोट्या निरीक्षणातून विज्ञाननिष्ठेला वाव देणे शक्य आहे, असे मत व्यक्त केले.
उद्घाटन समारंभास मुख्याध्यापक संघाचे सचिव आर. वाय. पाटील, टी. एल. मोळे, आर. व्ही. कांबळे, कादर मलबारी, अमिर शिंदी, हाजी मुजावर उपस्थित होते.

Web Title: From Exst Fan to Security