Kolhapur-TET Paper leak case: तपासात परीक्षा परिषदेचे असहकार्य, पोलिसांचा अनुभव
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 11:42 IST2025-11-28T11:42:12+5:302025-11-28T11:42:53+5:30
परीक्षा परिषदेकडून सहकार्याची अपेक्षा

Kolhapur-TET Paper leak case: तपासात परीक्षा परिषदेचे असहकार्य, पोलिसांचा अनुभव
कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचा कारभार पुन्हा एकदा संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. टीईटी पेपर फुटीप्रकरणी चौकशीला गेलेल्या तपास पथकाला परीक्षा परिषदेने गोपनीय माहिती देण्यास नकार दिल्याचे कोल्हापूरपोलिसांनी सांगितले. असहकार्यामुळे परीक्षा परिषदेच्या कारभाराबद्दल संशयकल्लोळ निर्माण झाला आहे. दरम्यान, याबाबत परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांना विचारणा केली असता, त्यांनी वरिष्ठांची बैठक घेऊन निर्णय घेतला जात आहे, अशी माहिती दिली.
टीईटी परीक्षेचा पेपर फोडण्याच्या तयारीतील टोळीला अटक केल्यानंतर पोलिसांचा तपास परीक्षा परिषदेकडे वळला. मुरगुड पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी करे यांचे पथक बुधवारी पुणे येथील परीक्षा परिषदेच्या कार्यालयात पोहोचले. परीक्षेचे आयोजन करण्याची जबाबदारी दिलेल्या संस्थेचे नाव, प्रश्नपत्रिका तयार केलेली समिती, छपाई केंद्राचे नाव आणि पत्त्याची मागणी केली.
मात्र, ही सर्व गोपनीय माहिती देण्यास परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नकार दिला. तातडीने माहिती देता येणार नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत चर्चा करून पुढील निर्णय घेऊ, अशी माहिती अधिकाऱ्यांनी पोलिसांना दिली. तपासासाठी आवश्यक माहिती परिषदेकडून वेळेत मिळत नसल्याने तपास अधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.
परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांच्याशी 'लोकमत' ने संपर्क साधला. ते म्हणाले, 'बुधवारी सायंकाळी कोल्हापूर पोलिस आमच्याकडे पोहोचले. त्यांनी तातडीने माहितीची मागणी केली. मात्र, गोपनीय माहिती देण्यासाठी काही प्रक्रिया असते. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून पुढील निर्णय सांगतो, असे त्यांना कळवले आहे. पेपर फुटीच्या गुन्ह्याचा उलगडा होऊन दोषींना शिक्षा व्हावी, अशी आमचीही भूमिका आहे. तपासासाठी आवश्यक असलेली माहिती देण्याचा प्रयत्न सुरू आहे.'
परीक्षा परिषदेकडून सहकार्याची अपेक्षा
टीईटी परीक्षेचे नियोजन कोणत्या कंपनीला दिले होते? प्रश्नपत्रिका कोणी तयार केल्या? त्यांची छपाई कुठे झाली? प्रश्नपत्रिका सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी कोणाची होती? याची माहिती मिळाल्याशिवाय तपास पुढे जाणार नाही. पुन्हा असे प्रकार घडू नयेत, यासाठी परीक्षा परिषदेने स्वत:च पुढाकार घेऊन पोलिसांना तपासात सहकार्य करणे अपेक्षित असल्याचे तपास अधिकारी पोलिस उपअधीक्षक सुजीत क्षीरसागर यांनी सांगितले.
रितेशकुमार अन् गायकवाड बंधूंची भेट
टीईटीची प्रश्नपत्रिका पुरवणारा रितेशकुमार आणि कराड तालुक्यातील गायकवाड बंधू यांची २० नोव्हेंबरला पुण्यातील एका हॉटेलमध्ये भेट झाली होती. रितेशकुमारसोबत आणखी पाच जण होते. त्या सर्वांची माहिती पोलिसांना मिळाली आहे. लवकरच त्यांच्यावर अटकेची कारवाई होईल, अशी माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली.