रस्त्यासाठी बैठकांचाच जोर

By Admin | Updated: November 14, 2014 00:37 IST2014-11-14T00:33:01+5:302014-11-14T00:37:32+5:30

नगरोत्थान योजना : प्रत्यक्ष अंमल कधी होणार ? कामाच्या नियोजनासाठी तिसऱ्यांदा बैठक

Emphasis of meetings for the road | रस्त्यासाठी बैठकांचाच जोर

रस्त्यासाठी बैठकांचाच जोर

कोल्हापूर : शहरातील रस्ते चकाचक करण्यासाठी रखडलेली १०८ कोटींची नगरोत्थान योजना पुन्हा सुरू होत आहे. इतर शासकीय निधीतून १५०हून अधिक लहान-मोठ्या रस्त्यांची बांधणी व दुरुस्तीचे नियोजन महापालिकेने केले आहे. रस्त्यांच्या नियोजनासाठी आयुक्त, शहर अभियंता व आता महापौरांच्या दरबारात बैठकीच्या फेऱ्या होत आहेत; मात्र कागदावरील रस्त्यांचे नियोजन प्रत्यक्षात कधी येणार व केलेले काम दर्जेदार होणार काय? असा सवाल नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.
शहरातील नगरोत्थान योजनेतून ३९ किलोमीटर व इतर शासकीय योजनेअंतर्गत १५० रस्त्यांसाठीची निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. प्रत्यक्षात १० नोव्हेंबरपासून सुरू होणारे हे काम अद्याप कागदावरच आहे. आठ दिवसांत रस्ते चकाचक करण्यास सुरुवात होईल, ही घोषणा वल्गनाच ठरली आहे. दर्जेदार रस्त्यांसाठी सभागृहाने आणाभाका घेतल्या, प्रशासनाने अधिकाऱ्यांसह ठेकेदारांवर कारवाईचा इशारा दिला. आयुक्तांनी तर रस्त्यांच्या कामात चिरीमिरीसाठी आडवे येणाऱ्या नगरसेवकांवर गुन्हा दाखल करण्याची तंबी दिली आहे; मात्र प्रत्यक्षात शाहूपुरीतील पहिल्याच रस्त्याचे काम चिरीमिरीत अडकले. नियोजन, इशारे, उद्घाटनांचा ‘शो’ यात अडकलेले शहरातील रस्त्याचे काम प्रत्यक्षात सुरू कधी होणार, असा सवाल नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.
रस्त्यांच्या कामासाठी निकष व वेळेची मर्यादा घालून देण्यात आलेली आहे. वेळेत व दर्जेदार काम न करणाऱ्या ठेकेदारांवर दंडात्मक रकमेसह कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेऊनही तांत्रिक प्रक्रियेत अनेक रस्ते अडकल्याचे चित्र आहे. निधीची तरतूद असूनही ठेकेदारांनी पाठ फिरविल्याने रेंगाळलेला नगरोत्थान प्रकल्प आता पुन्हा सुरू होणार आहे. उपशहर अभियंता एम. एम. निर्मळे यांनी दिलेला दिवाळीचा मुहूर्तही टळला आहे. कोटीचा निधी येऊन चार वर्षे होत आली तरीही निव्वळ नियोजनातील ढिलाईमुळे रस्त्यांची दुरवस्था झाल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Emphasis of meetings for the road