यंत्रमाग व्यवसायाला जुन्याच दराने वीज बिलाची आकारणी

By Admin | Updated: August 3, 2015 00:09 IST2015-08-02T23:12:33+5:302015-08-03T00:09:11+5:30

अनिल बाबर : मुंबईतील बैठकीत ऊर्जामंत्र्यांचे आश्वासनच; यंत्रमागधारकांना दिलासा

Electricity bill payment at the oldest rate for the powerloom business | यंत्रमाग व्यवसायाला जुन्याच दराने वीज बिलाची आकारणी

यंत्रमाग व्यवसायाला जुन्याच दराने वीज बिलाची आकारणी

विटा : यंत्रमाग लघुउद्योगातील २७ अश्वशक्तीच्या खाली आणि त्यापेक्षा जास्त क्षमतेच्या यंत्रमागाची वाढीव दराने आलेली वीजबिले जुन्या दरानेच भरून घेण्यात येतील, असे आश्वासन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले असून, यंत्रमागधारकांना जुन्या दरानेच वीजबिले भरण्याची परवानगी देण्यात आली असल्याची माहिती आ. अनिल बाबर यांनी दिली.
यंत्रमागाच्या वीजदरात फरक होता. नव्या दराने वीजबिले आकारली गेल्याने वाढीव वीजबिलाचा फटका यंत्रमागधारकांना बसला होता. त्या पार्श्वभूमीवर यंत्रमागांना जुन्या दराने वीजबिल आकारणी करावी, अशी मागणी यंत्रमागधारकांतून होत होती. त्यामुळे मुंबईत ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासमवेत आमदार अनिल बाबर, आमदार सुरेश हाळवणकर यांच्यासह महावितरणचे मुख्य अभियंता सतीश बापट, संचालक अभिजित देशपांडे यांची बैठक झाली. या बैठकीत झालेल्या निर्णयाची माहिती आ. अनिल बाबर यांनी रविवारी विटा येथे पत्रकार परिषदेत दिली. आ. बाबर म्हणाले, वीज नियामक आयोगाने एक जूनपासून वीजदराची पुनर्रचना केली आहे. परंतु आयोगाने ठरवलेल्या तसेच राज्य शासनाच्या दरात वेगवेगळे दर आकारले जात आहेत. त्यामुळे वीजदर कमी होण्याऐवजी वाढत असल्याचे यावेळी बैठकीत ऊर्जामंत्री बावनकुळे यांच्या निदर्शनास आणून दिले. त्याबाबतचा प्रश्नही विधानसभेच्या अधिवेशात उपस्थित केला होता. राज्य शासन यंत्रमाग दरात कोणत्याही परिस्थितीत वाढ होऊ देणार नाही. प्रसंगी परिपत्रक रद्द करण्याची किंवा अनुदान देण्याचे आश्वासन ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी दिले होते.
त्यानंतरही राज्यभरातील यंत्रमागधारकांना वाढीव वीजबिले देण्यात आल्याने ऊर्जामंत्र्यांच्या दालनात आ. हाळवणकर यांच्यासह महावितरणच्या अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी आ. हाळवणकर यांनी यंत्रमागधारकास वाढीव वीजबिल लागू केल्यास व्यावसायिकांसमोर येणाऱ्या अडचणींची बैठकीत माहिती दिली.
महावितरणच्या अभियंत्यांनी यंत्रमागाला जुन्या दरानुसार वीजबिले आकारणी करण्यासाठी दोनशे कोटी रुपयांची तरतूद करणे आवश्यक असल्याचे सांगितले. ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी आवश्यक निधीचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर तातडीने देण्याचा आदेश दिला असल्याचे आ. बाबर यांनी सांगितले.
यंत्रमागधारकांना जुन्या दरानेच वीजबिल आकारणी करावी, वाढीव वीज बिलाच्या कारणावरून कोणत्याही यंत्रमागधारकांचे वीज कनेक्शन तोडू नये, असे आदेश ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी दिले आहेत. शासनाच्या या निर्णयामुळे राज्यातील यंत्रमागधारकांना मोठा दिलासा मिळणार असल्याचेही आ. बाबर म्हणाले. (वार्ताहर)

Web Title: Electricity bill payment at the oldest rate for the powerloom business