सकाळी गर्दी, संध्याकाळी सन्नाटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:22 IST2021-05-10T04:22:51+5:302021-05-10T04:22:51+5:30

गेल्या महिन्याच्या १४ तारखेच्या रात्री आठ वाजल्यापासून ३० एप्रिलपर्यंत जिल्ह्यात कडक लॉकडाऊन करण्यात आला आहे तरीही नागरिकांची गैरसोय होऊ ...

Crowd in the morning, silence in the evening | सकाळी गर्दी, संध्याकाळी सन्नाटा

सकाळी गर्दी, संध्याकाळी सन्नाटा

गेल्या महिन्याच्या १४ तारखेच्या रात्री आठ वाजल्यापासून ३० एप्रिलपर्यंत जिल्ह्यात कडक लॉकडाऊन करण्यात आला आहे तरीही नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून सकाळी सात ते अकरा यावेळेत जीवनावश्यक वस्तू, भाजी मंडई सुरू ठेवण्यास परवानगी दिली होती. मात्र, या वस्तू खरेदीच्या नावावर सकाळच्या वेळी मोठी गर्दी व्हायला लागली. ही बाब लक्षात आल्यानंतर महापालिका प्रशासक कादंबरी बलकवडे यांनी गेल्या सोमवारपासून शहरातील भाजी मंडई बंद ठेवण्याच्या तसेच जीवनावश्यक वस्तूच्या दुकानांतून फक्त घरपोच सेवा देण्याबरोबर रस्त्यावर कोणीही व्यवहार करणार नाही, अशा सूचना दिल्या.

काही दिवस या सूचनांची अंमलबजावणी झाली, पण रस्त्यांवर पुन्हा गर्दी व्हायला सुरवात झाली. रविवारी तर गर्दीने परिसीमा गाठली. कपिलतीर्थ, लक्ष्मीपुरीतील भाजी विक्रेते पुन्हा रस्त्यावर येऊन बसले. दुकाने सुरू झाली. जीवनावश्यक वस्तूंच्या दारात नागरिकांच्या रांगा लागल्या. सध्या आंब्याचा हंगाम असल्याने फळ विक्रेत्यांच्या गाड्यांवर मोठी गर्दी झाली. उपनगरांतील नर्सरीसुद्धा सुरू होत्या. साडेअकरानंतर हळूहळू व्यवहार बंद व्हायला लागले. फळांच्या गाड्या तर दुपारपर्यंत सुरूच होत्या. दुपारनंतर मात्र शहरात सन्नाटा पसरला.

नागरिक मोठ्या संख्येने घराबाहेर पडल्यामुळे रस्त्यावर वाहनांची गर्दी झाली. काही ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाल्याचेही चित्र पाहायला मिळाले. रविवारी महापालिकेला सुटी असल्याने कर्मचारी दिसले नाहीत, परंतु पोलिसांनी मात्र दुपारनंतर सर्व व्यवहार बंद करून रस्ते मोकळे केले.

शहरात तसेच जिल्ह्यात कोरोना रुग्णांची रोज संख्या वाढत असताना नागरिक मात्र अगदी बिनधास्त शहरात वावरत आहेत. भाजीमंडईत रविवारी सोशल डिस्टंन्सचा पार फज्जा उडाला होता. नागरिक एकमेकांना खेटून भाज्या खरेदी करत होते. इब्राहिम खाटिक चौकात तर पुढे जायला वाट मिळत नव्हती. फेरीवाले, पार्किंग केलेली वाहने, बाहेरून आलेली वाहने यामुळे नागरिकाना या गर्दीतूनच पुढे सरकावे लागत होते. एकंदरीत कोरोना गेल्याचेच चित्र होते.

Web Title: Crowd in the morning, silence in the evening