Kolhapur: जिममधील तरुणांना घातक इंजेक्शन विक्री करणाऱ्या गुन्हेगारास अटक, दुसऱ्यांदा कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 19:11 IST2025-11-28T19:09:46+5:302025-11-28T19:11:21+5:30
त्याच्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने दुसऱ्यांदा कारवाई केली

Kolhapur: जिममधील तरुणांना घातक इंजेक्शन विक्री करणाऱ्या गुन्हेगारास अटक, दुसऱ्यांदा कारवाई
कोल्हापूर : मेफेंटरमाइन सल्फेट या शरीराला घातक इंजेक्शन विक्री प्रकरणी रेकॉर्डवरील गुन्हेगार प्रशांत महादेव मोरे (वय ३५, रा. मोरेवाडी, ता. करवीर) यास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने गुरुवारी अटक केली. त्याच्याकडून ४० घातक इंजेक्शन बॉटलसह एक लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांनी सांगितले की, सुभाषनगर साई मंदिराजवळ प्रशांत मोरे मेफेंटरमाइन सल्फेट हे घातक इंजेक्शन विक्री करण्यास येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. दुचाकीवरून येताच पोलिसांनी त्याला सापळा रचून ताब्यात घेतले. त्याला विश्वासात घेऊन पोलिसांनी चौकशी केली. त्यावेळी दुचाकीच्या डिक्कीत तपकिरी रंगाची बॅग काढून दाखवली. त्यात घातक औषधाच्या बॉटल मिळून आल्या. त्या पोलिसांनी जप्त केल्या.
मोरे हा बॉडी बिल्डर (शरीरसौष्ठव) आहे. त्याची साळोखेनगर परिसरात जिम आहे. या जिममध्ये येणाऱ्या काही तरुणांना व्यायामापूर्वी तो, या इंजेक्शनची विक्री करत होता. जिमच्या नावाखाली त्याने हा धंदा सुरू ठेवला होता, असेही तपासात पुढे आले आहे. त्याच्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने दुसऱ्यांदा कारवाई केली आहे. सन २०२३ मध्येही त्याच्यावर कारवाई करण्यात आली होती. यावेळी त्याच्याकडून मेफेंटरमाईन इंजेक्शनचा साठा सापडला होता.