एकाच कुटुंबातील तिघांचा कोरोनाने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:26 IST2021-04-27T04:26:11+5:302021-04-27T04:26:11+5:30

नूल : कोरोनाच्या पहिल्या लाटेत कोरोनाला वेशीवरच रोखण्यात यशस्वी ठरलेल्या गडहिंग्लज तालुक्यातील निलजी गावात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने एकाच कुटुंबातील ...

Corona killed three members of the same family | एकाच कुटुंबातील तिघांचा कोरोनाने मृत्यू

एकाच कुटुंबातील तिघांचा कोरोनाने मृत्यू

नूल :

कोरोनाच्या पहिल्या लाटेत कोरोनाला वेशीवरच रोखण्यात यशस्वी ठरलेल्या गडहिंग्लज तालुक्यातील निलजी गावात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने एकाच कुटुंबातील तिघांचा अंत झाल्याने खळबळ उडाली आहे.

मुंबई येथे कामानिमित्त असणारी मुलगी गावी (निलजी) येथे आली; मात्र मुंबईहून येताना तिला कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळेच तिच्या संपर्कात आल्याने तिची आई, वडील व बहीणही बाधित झाले.

दरम्यान, वयाची सत्तरी गाठलेले तिचे वडील व साठीकडे झुकलेली आई आणि पस्तीशीच्या घरातील तिच्या लहान बहिणीला कोरोनाने आपले दाढेत घेतले. तर मोठ्या मुलीवर कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू असून, तिची तब्येत स्थिर आहे.

आई, वडील व बहिणीचा जीव वाचविण्यासाठी सेंट्रींगच्या कामावर मजुरी करणाऱ्या भावंडांनी आपली तुटपुंजी जमीनही गहाण ठेवली; मात्र नियतीने त्यांच्या प्रयत्नाला दाद दिली नाही. त्यामुळे आई, वडील व लहान बहिणीच्या मृत्यूने सैरभैर झालेल्या या भावंडांना व उपचार घेणाऱ्या मोठ्या बहिणीला गावकऱ्यांनी मानसिक आधार देण्याची गरज आहे.

Web Title: Corona killed three members of the same family