नंदकुमार ढेरे।
लाेकमत न्यूज नेटवर्क
चंदगड : भौगोलिक विस्ताराने मोठा असलेल्या चंदगड तालुक्यातील तहसील कार्यालयात ३ नायब तहसीलदारांसह ३ मंडल अधिकारी, ४ तलाठी, ५ लिपीक, ३ शिपाई, १० कोतवाल व एक स्वच्छक अशी २९ पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांमुळे उपलब्ध कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा भार पडत आहे. तसेच कामे वेळेत न झाल्यामुळे नागरिक व विद्यार्थ्यांना वेळेबरोबर आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागत आहे. त्यामुळे या कार्यालयातील रिक्त पदे तत्काळ भरावीत, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. तालुक्यात वाड्या- वस्त्यांसह १७० गावांचा समावेश आहे. तालुक्याचे ठिकाण असलेले चंंदगड हे पश्चिमेला असल्याने शिवाय दळणवळणाची सोय नसल्याने कामासाठी येणारे विद्यार्थी, शेतकरी, नागरिकांना दिवसभर ताटकळत बसावे लागत आहे.
चंदगड तहसील कार्यालयात तीन नायब तहसिलदारांचे काम अव्वल दर्जाचे कारकून संजय राजगोळे करत आहेत. त्यांच्यावरही अतिरिक्त कामांचा भार पडत आहे. रिक्त पदांमुळे तहसील कार्यालयातील कामे वेळेत न झाल्याने नागरिकांना महिनोंमहिने वाट पाहावी लागत आहे. त्यामुळे वेळेबरोबरच आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागत आहे. जुने दस्त, कागदपत्रे काढण्यासाठी तर सहा-सहा महिने वाट पाहावी लागो. ‘सरकारी काम आणि सहा महिने थांब’ या म्हणीची प्रचिती सध्या चंदगड तालुक्यातील नागरिकांना तहसील कार्यालयात अनुभवण्यास मिळत आहे. त्यामुळे चंदगड तहसील कार्यालयातील रिक्त पदे तत्काळ भरावीत, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
---------------------------
* चंदगड तहसील कार्यालयात महसूल खात्याने पंधरा दिवसांपूर्वी एन. एस. गायकवाड यांची पदोन्नतीने नायब तहसीलदार म्हणून नियुक्ती केली आहे. मात्र, पंधरा दिवस झाले तरी अद्यापही गायकवाड यांनी नायब तहसीलदार पदाचा कार्यभार स्वीकारलेला नाही. त्यामुळे वरिष्ठांनी याची दखल घेऊन दुसऱ्या नायब तहसीलदारांची नेमणूक करावी अथवा कार्यालयातील वरिष्ठ कर्मचाऱ्यांकडे तरी नायब तहसीलदार पदाचा कार्यभार द्यावा, अशी मागणी होत आहे.
कोट....
चंदगड तहसील कार्यालयातील रिक्त पदे तत्काळ भरावीत, यासाठी सचिवांकडे मागणी केली आहे. आठ दिवसात ही रिक्त पदे भरली नाहीत तर मुख्यमंत्र्याची प्रत्यक्ष भेट घेणार आहे. - राजेश पाटील, आमदार, चंदगड विधानसभा.