दक्षता घेतल्यास कोरोनामध्येही टाळता येईल ‘हार्टअटॅक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:25 IST2021-04-27T04:25:36+5:302021-04-27T04:25:36+5:30

कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचे उपचार घेणाऱ्या काही रुग्णांचे हार्टअटॅकने मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्याबाबत कोरोना आणि ...

Caution can prevent heart attack in corona | दक्षता घेतल्यास कोरोनामध्येही टाळता येईल ‘हार्टअटॅक’

दक्षता घेतल्यास कोरोनामध्येही टाळता येईल ‘हार्टअटॅक’

कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचे उपचार घेणाऱ्या काही रुग्णांचे हार्टअटॅकने मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्याबाबत कोरोना आणि हार्टअटॅक यांचा एकमेकांशी संबंध आहे का? याबाबतची माहिती ‘लोकमत’ ने हृदयरोग तज्ज्ञांकडून जाणून घेतली. सीपीआर रुग्णालयातील हृदयरोग तज्ज्ञ डॉ. विदुर कर्णिक यांनी सांगितले की, कोरोनामध्ये शरीरात सूक्ष्म स्वरूपातील सूज येऊन रक्ताच्या गुठळ्या होण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे आम्ही या रुग्णाला पहिल्यांदा रक्त पातळ होण्याचे इंजेक्शन देतो. रक्ताच्या गुठळ्या झाल्यास त्याचा रक्तपुरवठ्यावर परिणाम होऊन हार्टअटॅक येण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे कोरोनाबाबतचे उपचार सुरू असले, तरी हृदय, फुफ्फुस, मेंदूचे विकार असणाऱ्यांनी त्यांच्या गोळ्या बंद करू नयेत. अनेकदा रुग्ण आयसीयुमध्ये असतात. कोरोनामुळे कुटुंबीय, नातेवाइकांना या रुग्णाला भेटता येत नाही. त्यामुळे रुग्णांमध्ये एकाकीपणाची भावना निर्माण होते. त्यात त्याने मानसिक दबाव घेतल्यास हार्टअटॅक येण्याची शक्यता बळावते. त्यामुळे या रुग्णासमवेत कुटुंबीय, नातेवाइकांनी मोबाइलद्वारे संवाद साधावा. त्याला मानसिक आधार द्यावा. हृदयरोग तज्ज्ञ डॉ. अनुप बारदेस्कर यांनी सांगितले की, रक्तामध्ये गुठळ्या झाल्याने कोरोनामध्ये हार्टअटॅक येण्याची अधिक शक्यता असते. त्यामुळे फुफ्फुस, हृदयरोग असणाऱ्यांनी त्यांना अचानक ताप आल्यास, खोकला सुरू झाल्यास, धाप लागण्याचे प्रमाण वाढल्यास त्यांनी तातडीने वैद्यकीय तपासणी करून घ्यावी. रक्तदाब, मधुमेह आणि ६५ वर्षांवरील रुग्णांनी अधिक दक्षता घ्यावी. अशा रुग्णांवर मानसिक ताण येणार नाही, याची काळजी कुटुंबीयांनी घ्यावी.

चौकट

योग्य आहार, हलका व्यायाम

या रुग्णांनी योग्य आहार, नियमित आणि वेळेवर औषधे घ्यावीत. घरामध्ये चालण्यासह हलका व्यायाम करावा. काही शारीरिक त्रास जाणवल्यास डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यावी, असे डॉ. बारदेस्कर यांनी सांगितले.

चौकट

तर, ९९ टक्के बरे होता येते

रेमडेसिविरच्या मागे धावण्यापेक्षा अन्य उपयुक्त औषधांद्वारे आणि डॉक्टरांच्या योग्य सल्ल्याने कोरोनातून ९९ टक्के बरे होता येत असल्याचे डॉ. कर्णिक यांनी सांगितले.

Web Title: Caution can prevent heart attack in corona