सांगलीच्या अकादमीची बोगसगिरी

By Admin | Updated: September 7, 2016 01:14 IST2016-09-07T01:14:08+5:302016-09-07T01:14:21+5:30

नाशिक सैन्य भरती : बनावट कागदपत्रे सादर केल्याचा आरोप

Bogli Bhabha Sangli Academy | सांगलीच्या अकादमीची बोगसगिरी

सांगलीच्या अकादमीची बोगसगिरी

सिडको (नाशिक): सांगली जिल्ह्यातील एका अकादमीच्या माध्यमातून सर्व वैयक्तिक पुराव्याची कागदपत्रे नाशिक जिल्ह्यामधील असल्याचे दाखवून बनावट कागदपत्रांच्या माध्यमातून सैन्य भरतीसाठी आलेल्या तरुणांचा जागरूक नागरिकांमुळे पर्दाफाश झाला आहे. यामुळे नाशिक जिल्ह्याच्या सैन्य भरती प्रक्रियेपुढे पुन्हा बनावट कागदपत्रांचे आव्हान कायम राहणार आहे.
याबाबत अंबड पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शुक्रवारी (दि.९) होणाऱ्या नाशिक जिल्ह्याच्या सैन्य भरतीसाठी सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर या शहरांमधून सुमारे तीनशेहून अधिक तरुण नाशिकचे रहिवासी असल्याची बनावट कागदपत्रे तयार करून सिडकोच्या संभाजी स्टेडिअमवर सोमवारी मध्यरात्रीपासून मुक्कामाला होते. जिल्ह्यातील तरुणांसाठी असलेल्या सैन्य भरतीमध्ये हे तरुण बनावट कागदपत्रांच्या आधारे प्रवेश करण्याच्या तयारीमध्ये होते.
तीनशे तरुणांचा जत्था सोमवारपासून मंगळवारी रात्री आठ वाजेपासून मैदानावर तळ ठोकून होता. यावेळी तरुणांनी दिवसभर मैदानावर सरावही केला. सायंकाळच्या सुमारास सिडको, अंबड, सातपूर भागातील काही तरुण सरावासाठी मैदानावर पोहचले त्यावेळी सैन्य भरतीसाठी इच्छुक असलेल्या तरुणांची एवढी मोठी संख्या पाहून ते चक्रावले. त्यांच्यापैकी काहींनी नगरसेवक शीतल भामरे, संजय भामरे यांच्याशी संपर्क साधून याबाबत माहिती दिली. दरम्यान, बाहेरगावाहून आलेल्या तरुणांना याबाबत कुणकुण लागल्याने त्यांनी हळूहळू मैदान सोडण्यास सुरुवात केली.
स्थानिक व बाहेरगावाहून आलेल्या तरुणांमध्ये वादविवाद घडण्याची शक्यता भामरे यांनी अंबड पोलिसांकडे भ्रमणध्वनीवरून व्यक्त केली. त्यानंतर रात्री साडेआठ
वाजेच्या सुमारास पोलिसांनी स्टेडिअम गाठले; मात्र तोपर्यंत बाहेरगावाहून बनावट कागदपत्रे घेऊन सैन्याच्या भरतीसाठी आलेले सर्व तरुण पसार झाले होते. अंबड पोलीस ठाण्याचे पथक त्यांचा शोध घेत आहेत. (वार्ताहर )


स्टेडिअममध्ये प्रवेश मिळाला कसा ?
सोमवारी मध्यरात्री आलेल्या अडीचशे मुलांच्या जमावाला मुक्कामासाठी मैदानात प्रवेश मिळाला कसा, असा सवाल उपस्थित केला जात आहे. सकाळी अकरा वाजेपर्यंत या तरुणांकडून पालिकेच्या संबंधित कर्मचाऱ्यांनी शुल्कदेखील वसूल केलेले नव्हते.

Web Title: Bogli Bhabha Sangli Academy