बालिंगा पुलाचा पायथाच पोखरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:21 IST2021-01-21T04:21:28+5:302021-01-21T04:21:28+5:30
कोपार्डे : बालिंगा येथील ऐतिहासिक पुलाच्या पायथ्यालगतच्या भिंतीपर्यंतची माती डोझरने हटविल्याने पुलाच्या दगडी बांधकामाच्या भिंतीला धोका होण्याची ...

बालिंगा पुलाचा पायथाच पोखरला
कोपार्डे : बालिंगा येथील ऐतिहासिक पुलाच्या पायथ्यालगतच्या भिंतीपर्यंतची माती डोझरने हटविल्याने पुलाच्या दगडी बांधकामाच्या भिंतीला धोका होण्याची भीती निर्माण झाली आहे. हा पूल रहदारीच्या दृष्टीने महत्त्वाचा असून, एखादी दुर्घटना होण्याअगोदर प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे. कोल्हापूर-गगनबावडा रस्त्यावर बालिंगा (ता. करवीर) येथे ब्रिटिशकालीन पूल आहे. या मार्गाने गगनबावडा मार्गे करुळ घाटातून कणकवली व भुईबावडा घाटातून राजापूरकडे तसेच अणुस्कुरा घाटातून तळकोकणातून गोव्याकडे जाता येते. कोकणला जोडणाऱ्या या पुलावर प्रचंड रहदारी असते. या पुलाच्या पूर्वेला व पश्चिमेला दगडी बांधकाम असलेली रेखीव व आखीव भक्कम संलग्न भिंत आहे. या भिंतीच्या पायथ्याला लागून असणारा भराव मोठ्या प्रमाणात हटविला आहे. या ठिकाणी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह असतो. पायथ्याशी असणारी भर काढल्यामुळे या पुलाच्या दगडी बांधकामाला मोठा धोका उद्भवण्याची शक्यता आहे.
चौकट १) पुलाच्या भरावावर मोठे वृक्ष : पुलाच्या दोन्ही बाजूला असणाऱ्या भरावावर मोठी झाडेझुडपे आहेत. या वृक्षाच्या मुळांनी या भरावातील दगडी बांधकामांना मोठे नुकसान झाले असून, बांधकाम विभागाने याकडेही कानाडोळा केला आहे.
फोटो २० बालिंगा पूल
बालिंगा येथील ऐतिहासिक पुलाच्या पूर्वेला असणाऱ्या सलग्न भिंतीच्या पायथ्याशी डोझरने माती काढून वाफा तयार करण्यात आला आहे.