Kolhapur: नरतवडे येथे वृद्ध महिलेचा शेतात दगडाने ठेचून खून, खुनाचे कारण अद्यापही अस्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2024 01:40 PM2024-04-23T13:40:53+5:302024-04-23T13:41:09+5:30

यात्रेचा पाळक असल्याने शेतशिवारात सन्नाटा

An old woman was stoned to death in a field in Naratwade Kolhapur | Kolhapur: नरतवडे येथे वृद्ध महिलेचा शेतात दगडाने ठेचून खून, खुनाचे कारण अद्यापही अस्पष्ट

Kolhapur: नरतवडे येथे वृद्ध महिलेचा शेतात दगडाने ठेचून खून, खुनाचे कारण अद्यापही अस्पष्ट

सरवडे : नरतवडे (ता.राधानगरी) येथे श्रीमती आक्काताई केशव रामाणे (वय ६५) या वृद्ध महिलेचा शेतात अमानुषपणे दगडाने ठेचून खून करण्यात आला आहे. मयत महिलेच्या गळ्यातील सोन्याचा गुंड गायब, तर कानातील कर्णफुले तशीच आहेत. गुन्ह्याची नोंद मुलगा बाळासो केशव रामाणे यांनी राधानगरी पोलिस ठाण्यात केली आहे. खुनाचे कारण अस्पष्ट असल्याने पोलिस विविध अंगाने शोध घेत आहेत.

घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, नरतवडे येथील आक्काताई रामाणे या डोंगरालगतच्या टेंबूर नावाच्या शेतात उसाला पाणी देण्यासाठी गेल्या होत्या. दुपारी ३ च्या दरम्यान त्यांचा मुलगा बाळासो रामाने आईला बघण्यासाठी गेला असता त्यांना उसाच्या सरीत आई छिन्नविच्छिन्न व दगडाने ठेचलेल्या अवस्थेत दिसली. ही घटना त्यांनी गावचे पोलिस पाटील व राधानगरी पोलिस ठाण्यात कळविली.

घटनास्थळी पोलिस फौजफाटा पोहोचताच त्यांनी विविध कारणांच्या अनुषंगाने तपास सुरू केला. नरतवडे येथील ज्योतिर्लिंग चैत्र असल्याने गावचा पाळक पाळला असल्याने शेतशिवार सुनसान होता. याची संशयित आरोपीला माहिती असणार याचाच त्याने फायदा घेतला असणार, असा प्राथमिक अंदाज घेतला. या खुनाच्या घटनेची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरल्यांने नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती.

घटनास्थळाचा पोलिसांनी रीतसर पंचनामा करून मृतदेह सोळांकुर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यांच्या मागे मुलगा, सून, नातू असा परिवार आहे. पुढील तपास पीएसआय महेश घिर्डीकर, हवालदार क्रुष्णात यादव, शुभांगी जठार, क्रुष्णात खामकर, दिगंबर बसरकर, किरण पाटील, रघुनाथ पोवार करत आहेत.

Web Title: An old woman was stoned to death in a field in Naratwade Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.