कोल्हापूरातील दारु दुकानांना अभय

By Admin | Updated: June 20, 2017 18:43 IST2017-06-20T18:43:03+5:302017-06-20T18:43:03+5:30

मनपा सभेत वादग्रस्त रस्ते हस्तांरणाचा ठराव बहुमताने मंजूर, अभूतपूर्व गोंधळ, मानदंड पळविण्याचा प्रयत्न

Abhay to the liquor shops in Kolhapur | कोल्हापूरातील दारु दुकानांना अभय

कोल्हापूरातील दारु दुकानांना अभय


आॅनलाईन लोकमत

कोल्हापूर, दि. २0 : शहरातील प्रमुख पाच रस्त्यावरील बंद झालेल्या मद्य विक्रीस प्रत्यक्ष प्रोत्साहन देणारा रस्ते हस्तांतरणाचा ठराव मंजूर करण्यावरून महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंगळवारी अभूतपूर्व गोंधळा झाला. सत्तारूढ आणि विरोधक एकमेकांच्या समोर ठाकल्याने तब्बल पाच तास शाहू सभागृह जणू कुस्तीचा आखाडाच बनले. एकमेकांच्या अंगावर धावून जाण्यासह धक्काबुक्की, जोरदार घोषणाबाजी आणि मानदंड पळविण्याचा प्रयत्नामुळे सभागृहाच्या कामकाजाचा एक नवा इतिहास लिहिला गेला. ज्याच्यासाठी गोंधळ उडाला तो रस्ते हस्तांतराचा वादग्रस्त ठराव सत्तारूढ कॉँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने बहुमताने जिंकला.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे शहरातून जाणाऱ्या चार राज्य मार्ग व एक राष्ट्रीय मार्गावरील ८९ मद्य विक्रीची दुकाने बंद झाली आहेत. ती चालू करता यावीत म्हणून महापालिकेतील सत्तारूढ कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेस आघाडीतर्फे हे पाच रस्ते ताब्यात घेण्याचा ठराव मांडला होता. त्यास भाजप - ताराराणी आघाडीने तीव्र विरोध केला. सभागृहात झालेला हा विरोध मोडून काढत सत्तारुढ आघाडी सदस्यांनी बहुमताच्या जोरावर ठराव मंजूर करुन घेतलाच शिवाय टीकेचे धनीही बनले.

ठरावाला विरोध करताना सभागृहात जोरदार घोषणाबाजी झाली. ‘दारुबंदी झालीच पाहिजे’ अशा घोषणांनी सभागृह दुमदुमले. त्याचवेळी विरोधकांना सत्तारुढ सदस्यांनीही ‘रस्ते हस्तांतर झालेच पाहिजे’ अशा घोषणा देत जोरदार प्रत्युत्तर दिले. या घोषणाबाजीवेळी सत्तारुढ सदस्य प्रतापसिंह जाधव यांनी विरोधी गटाच्या कमलाकर भोपळेंना धक्काबुक्की केली. त्यामुळे गोंधळात आणखी भर पडली. कोण काय बोलतोय हे कळत नव्हते एवढा आरडा ओरड सुरु होती. शेवटी महापौर हसीना फरास यांनी अर्ध्या तासाकरीता सभागृह तहकुब केले.

Web Title: Abhay to the liquor shops in Kolhapur