Kolhapur: दिल को, बाजार नही बनाया; स्टेटस ठेवून कोल्हापुरातील तरुणाने घेतली पंचगंगेत उडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 12:01 IST2025-11-28T12:01:19+5:302025-11-28T12:01:32+5:30
Kolhapur Crime: व्हॉट्सॲप स्टेटस आणि मोबाइल कॉल डिटेल्सवरून सुगावा लागेल, अशी माहिती पोलिसांनी दिली

Kolhapur: दिल को, बाजार नही बनाया; स्टेटस ठेवून कोल्हापुरातील तरुणाने घेतली पंचगंगेत उडी
कोल्हापूर : 'मला माझ्या चारित्र्यावर अभिमान आहे. ‘दिल को दिल रहने दिया, बाजार नही बनाया,’ असा व्हॉट्सॲप स्टेटस ठेवून सुमित विक्रांत तेली (वय ३०, रा. शुक्रवार पेठ, कोल्हापूर) या तरुणाने शिवाजी पुलावरून पंचगंगेत उडी घेऊन आत्महत्या केली. गुरुवारी (दि. २७) सकाळी साडेदहाच्या सुमारास त्याचा मृतदेह सापडला. या घटनेने सुमितचे मित्र आणि नातेवाईकांना धक्का बसला.
मृत सुमितच्या मित्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तो शुक्रवार पेठेतील घरात आई-वडील आणि लहान भावासोबत राहत होता. शाहूपुरीत त्याचे रेडियम आर्ट आणि ट्रॉफी तयार करण्याचे दुकान होते. त्याचा व्यवसाय उत्तम चालला होता. बुधवारी दिवसभर तो मोबाइलवरून मित्रांच्या संपर्कात होता. रात्री पावणेनऊच्या सुमारास त्याने व्हॉटस्ॲप स्टेटस बदलले. 'मला माझ्या चारित्र्याचा अभिमान आहे. दिल को दिल रहने दिया, बाजार नही बनाया,' असा स्टेटस त्याने ठेवले. त्यानंतरही तो काही मित्रांच्या संपर्कात होता.
रात्री अकराच्या सुमारास त्याने शिवाजी पुलावरून पंचगंगा नदीत उडी घेतल्याचे त्याच्या ओळखीतील व्यक्तींनी पाहिले. याची माहिती त्यांनी त्याच्या नातेवाइकांना दिली. अग्निशामक दलाच्या जवानांसह करवीर पोलिसांनी गुरुवारी सकाळी शोधमोहीम राबवली. साडेदहाच्या सुमारास त्याचा मृतदेह शिवाजी पुलापासून काही अंतरावर सापडला. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. याची नोंद करवीर पोलिस ठाण्यात झाली.
स्टेटसची चर्चा
सुमित उत्साही आणि सतत कामात राहणारा धडपडी तरुण होता. बुधवारी रात्री त्याने व्हॉट्सॲपचे स्टेटस बदलले. त्यानंतर काही तासांत त्याने आत्महत्या केली. त्याने एवढे टोकाचे पाऊल उचलण्याचे कारण शोधण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. त्याचे व्हॉट्सॲप स्टेटस आणि मोबाइल कॉल डिटेल्सवरून सुगावा लागेल, अशी माहिती पोलिसांनी दिली.