मलकापूर : कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावरील शाहूवाडी तालुक्यातील जुळेवाडी-भैरेवाडी खिंडीतील वळणावर चिरा भरून कोल्हापूरच्या दिशेने जात असताना ट्रक चाळीस फूट खोल दरीत कोसळला. या दुर्घटनेत ट्रकचालक रवींद्र शिवाजी चव्हाण (वय ३५, रा. माले-शहापूर, ता. पन्हाळा) हे जागीच ठार झाले. ही घटना रविवारी, (दि. १८) घडली.पोलिसांतून मिळालेली महिती अशी, ट्रकचालक रवींद्र चव्हाण ट्रक घेऊन रत्नागिरी जिल्ह्यातील निवळी येथून बांधकामाचा चिरा भरून कोल्हापूरच्या दिशेने येत होते. ट्रक कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावरून जुळेवाडी-भैरेवाडी गावच्या हद्दीतील वळणावरून जात असताना चालकाचा ट्रकवरील ताबा सुटून टूक चाळीस फूट खोल दरीत कोसळला. ट्रकमधील चिरा चालक रवींद्र चव्हाण यांच्या अंगावर पडल्याने त्यांचा जागीच मुत्यू झाला. ही घटना शाहूवाडी पोलिसांना समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. भैरेवाडी गावात अपघाताची महिती समजताच येथील ग्रामस्थांनी चिऱ्यात अडकलेला चालकाचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी पोलिसांना मदत केली. पोलिसांनी चालकाचा मृतदेह मलकापूर ग्रामीण रुग्णालयात पाठविला. मलकापूर ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला. त्यांच्या पाश्चात पत्नी, आई, दोन मुले असा परिवार आहे. रवींद्र यांच्या मृत्यूने माले-शहापूर गावावर शोककळा पसरली आहे.
अर्धवट कामामुळे पाच वर्षांत पाच अपघातकोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावरील जुळेवाडी खिंडीतील मोरीचे काम गेली वीस वर्षे केलेले नाही. काम करण्यासाठी माजी खासदार निवेदिता माने यांनी ४५ लाखांचा निधी मंजूर केला होता. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सरकारी बाबूंनी जागेवर सिमेंटचे नळे टाकून ४५ लाख रुपये हडप केल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होती. अर्थवट कामामुळे पाचजणांना आपला जीव गमवावा लागला आहे.