Kolhapur-ZP Election: महायुतीतच बिघाडी; कागलमध्ये मंडलिक एकटे लढणार; नेतेमंडळी कुठं, कोणाविरोधात शड्डू ठोकणार.. वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 17:23 IST2026-01-20T17:22:36+5:302026-01-20T17:23:18+5:30

चंद्रकांत पाटील पालकमंत्र्यांच्या घरी

A split is possible within the Mahayuti in seven talukas for Kolhapur Zilla Parishad | Kolhapur-ZP Election: महायुतीतच बिघाडी; कागलमध्ये मंडलिक एकटे लढणार; नेतेमंडळी कुठं, कोणाविरोधात शड्डू ठोकणार.. वाचा सविस्तर

Kolhapur-ZP Election: महायुतीतच बिघाडी; कागलमध्ये मंडलिक एकटे लढणार; नेतेमंडळी कुठं, कोणाविरोधात शड्डू ठोकणार.. वाचा सविस्तर

कोल्हापूर : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यास केवळ ४८ तास शिल्लक असताना महायुतीमध्येच सात तालुक्यांमध्ये बिघाडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्या त्या तालुक्यातील आमदार आपल्या कार्यकर्त्यांसाठी हट्टाला पेटल्याने सोमवारी रात्री उशिरापर्यंत बैठका होऊनही कागलवगळता कोणत्याही तालुक्याचा अंतिम निर्णय झाला नाही. आज मंगळवारी दुपारपर्यंत याबाबत ठोस निर्णय होतील. 

तर काँग्रेसने बारा तालुक्यांतील इच्छुकांच्या त्या त्या ठिकाणी मुलाखती घेतल्या असून खासदार शाहू छत्रपती आणि आमदार सतेज पाटील यांनी करवीर तालुक्यातील प्रमुखांशी सोमवारी चर्चा केली. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी गारगोटी येथे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.

हातकणंगलेमध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी

हातकणंगलेमध्ये भाजप, शिंदेसेना आणि जनसुराज्य या महायुतीचे जागा वाटप अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. तर काँग्रेस, स्वाभिमानी, उद्धवसेना आणि वंचित आघाडी यांनी एकत्र येऊन निवडणुकीची घोषणा केली आहे.

शाहूवाडीत जनसुराज्यविरोधात भाजप

शाहूवाडी तालुक्यात पक्षापेक्षा गटाच्या राजकारणाला महत्त्व आहे. विद्यमान आमदार डॉ. विनय कोरे यांनी भाजपचा काही जागांचा प्रस्ताव फेटाळल्याने भाजपने स्वतंत्रपणे या ठिकाणी स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

चंदगडमध्ये भाजप, शिंदेसेना एकत्र

चंदगड तालुक्यात नगरपंचायतीचेच राजकारण पुढे चालण्याची चिन्हे दिसत आहेत. या ठिकाणी भाजप, शिंदेसेनाविरोधात दोन्ही राष्ट्रवादीसह काँग्रेस अशी लढाई होण्याची शक्यता आहे. आमदार शिवाजीराव पाटील हे स्वबळासाठी आग्रही असून पंचायत समितीच्या दोन जागा शिंदेसेनेला दिल्या जाऊ शकतात. मात्र, दोन्ही राष्ट्रवादी या काँग्रेसच्या प्रतिसादाच्या प्रतीक्षेत आहेत.

कागलमध्ये मंडलिकांना वगळून महायुती

कागल तालुक्यात माजी खासदार संजय मंडलिक यांना वगळून मंत्री हसन मुश्रीफ, माजी आमदार संजय घाटगे व शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित घाटगे हे तिघे एकत्र आले आहेत. या तिघांमध्ये जागा वाटपही पूर्ण झाले असून जिल्हा परिषदेच्या सहा जागांपैकी तीन राष्ट्रवादीला आणि तीन भाजपला असेही निश्चित जागा वाटप अंतिम करण्यात आले आहे. त्यामुळे मंडलिक गटाला एकाकी लढत द्यावी लागणार आहे.

शिरोळमध्ये भाजप, यड्रावकर युतीचा निर्णय आज

शिरोळ तालुक्यात काँग्रेस, स्वाभिमानी व उद्धवसेना एकत्र या निवडणुका लढवणार असून दुसरीकडे आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या राजर्षी शाहू विकास आघाडीने स्वतंत्र चूल मांडली आहे. या सर्व घडामोडीत भाजप स्वतंत्र लढणार की यड्रावकरांसोबत जाणार यावरच अंतिम लढतीचे चित्र अवलंबून आहे.

पन्हाळ्यात मैत्रीपूर्ण लढतीची शक्यता

पन्हाळा तालुक्यातील प्रत्येकी एक जागा भाजप आणि शिंदेसेना यांना देऊन उर्वरित सर्व जागा लढवण्यासाठी जनसुराज्यची तयारी आहे. परंतु, या ठिकाणी आमदार चंद्रदीप नरके आणि जादा जागेचा आग्रह धरला तर मात्र भाजप, जनसुराज्य विरुद्ध शिंदेसेना अशी लढत होऊ शकते. काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशीही आघाडी या ठिकाणी करण्यासाठी चाचपणी सुरू आहे.

गडहिंग्लज तालुक्यात तिरंगी लढतीची शक्यता

गडहिंग्लज तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी तिरंगी लढतीचे संकेत आहेत. राष्ट्रवादी (अजित पवार) आणि (शरद पवार) या दोन्ही गटांनी एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. घड्याळ चिन्हावर लढायचे की आघाडीच्या चिन्हावर एवढाच मुद्दा बाकी आहे. त्यांच्या विरोधात भारतीय जनता पक्ष व जनता दल एकत्र येणार आहेत. काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना, वंचित बहुजन आघाडी, उद्धवसेना आणि मनसे यांची आघाडी मैदानात उतरणार आहे. जनसुराज्य शक्ती, शिंदेसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, उद्धवसेनाही काही जागांवर रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.

करवीरमध्ये महायुतीचे ठरेना, काँग्रेसची उमेदवार चाचपणी

करवीरमध्ये महायुती एकसंध राहणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटामुळे महायुतीत मिठाचा खडा पडण्याची शक्यता आहे. खासदार धनंजय महाडिक व आमदार चंद्रदीप नरके यांच्यातील सोमवारची चर्चा अपूर्ण राहिली आहे. राष्ट्रवादीला सोबत घेण्याची नरके यांची मानसिकता नाही.

आजऱ्यात आघाडीपाठोपाठ महायुतीमध्येही बिघाडी

आजरा तालुक्यात कार्यकर्त्यांनीच महाविकास आघाडीपाठोपाठ महायुतीमध्येही बिघाडी झाल्याचे जाहीर केले आहे. काँग्रेसचे नेते धनुष्यबाण व कमळाला हातात घेऊन निवडणुकीच्या रिंगणात शड्डू ठोकणार आहेत. त्यामुळे तालुक्यात तिरंगी लढत होणार आहे. महायुतीबरोबर भाजपचे न जुळल्यामुळे पेरणोलीमधून सुधीर देसाई तर उत्तूरमधून शिरीष देसाई यांची नावे दोन राष्ट्रवादी व ठाकरे सेनेकडून जाहीर झाली आहेत. भाजप व शिंदेसेनेचेही उमेदवारीवरून फिस्कटले आहे.

भुदरगडमध्ये संभ्रम कायम

भुदरगड तालुक्यात राजकीय सस्पेन्स शिगेला पोहोचला आहे. अद्याप कोणत्याही आघाड्या निश्चित न झाल्याने महायुती व महाविकास आघाडीत सध्या शांतता आहे. केवळ चर्चेच्या फैऱ्या झडत आहेत. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या तालुक्यातच महायुतीतील घटक पक्ष राष्ट्रवादी(अजित पवार)चे नेते माजी आमदार के. पी. पाटील हे त्यांचे राजकीय विरोधक असल्याने युती होणार का, त्यातून समाधानकारक जागा वाटप हा बिघाडीसाठी कळीचा मुद्दा ठरू शकतो.

राधानगरीत शिंदेसेना, भाजप युतीची शक्यता

राधानगरी तालुक्यात शिंदेसेना आणि भाजप एकत्र येण्याच्या तयारीत असून राहुल पाटील यांचा गट वगळून राष्ट्रवादी (अजित पवार) नाराजांना घेऊन लढण्याच्या स्थितीत आहे. ए.वाय. पाटील, राहुल पाटील आणि शेकाप एकत्र येण्याची शक्यता असून काँग्रेसची भूमिका अजून गुलदस्त्यात आहे. उद्धवसेना, जनता दल संभ्रमावस्थेत आहे.

गगनबावड्यात महायुती शक्य

गगनबावडा तालुक्यातील दोनपैकी एक जागा शिंदेसेना आणि एक जागा भाजपला देऊन युती शक्य असल्याचे दिसून येते. या ठिकाणी काँग्रेसकडून दोन्ही जागा लढवल्या जातील.

Web Title : कोल्हापूर ZP चुनाव: महायुति में दरार, मंडलिक अकेले लड़ेंगे।

Web Summary : कोल्हापूर ZP चुनाव में महायुति को झटका, कई तालुकाओं में सीट बंटवारे पर असहमति। मंडलिक कागल में अकेले चुनाव लड़ेंगे। कांग्रेस गठबंधन की तलाश में, स्थानीय गतिशीलता निर्वाचन क्षेत्रों में विविध मुकाबले को आकार देती है।

Web Title : Kolhapur ZP Election: Cracks in Mahayuti, Mandaliks to fight alone.

Web Summary : Mahayuti faces setbacks in Kolhapur ZP elections as seat-sharing disagreements persist across several talukas. Mandaliks will contest independently in Kagal. Congress explores alliances while local dynamics shape varied contests across constituencies.