संदीप आडनाईक
कोल्हापूर : समाजपरिवर्तनाच्या कामात अनेकदा कौतुक मिळतं, पुरस्कार मिळतात; पण कधीकधी एखादा साधा मेसेजही आयुष्यभराची ऊर्जा देऊन जातो. असाच अनुभव एचआयव्ही नॅशनल प्रोग्रामअंतर्गत काम करणाऱ्या आणि ‘थुंकीमुक्त चळवळी’च्या नेत्या दीपा शिपूरकर यांना आला.
तृतीयपंथी फीमेल सेक्स वर्कर भगिनींसोबत काम करताना पान, तंबाखू खाणे आणि सार्वजनिक ठिकाणी थुंकणे या सवयी मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. या सवयींमागील आरोग्याचे धोके लक्षात घेऊन शिपूरकर गेली अनेक वर्षे सातत्याने जनजागृती करत आहेत. “स्वतःची काळजी घ्या, तंबाखू सोडा, थुंकू नका,” हा त्यांचा प्रेमाचा आग्रह अनेकांपर्यंत पोहोचत होता.
दरम्यान, ‘मदर्स डे’निमित्त एका तृतीयपंथी भगिनीने ''मी साडी नेसली, जोगत्या झाले, गैरधंदा केला, घराण्याची अब्रू घालवली; पण तू तुझ्या घरात मला राहायला दिलेस, त्याचे उपकार'' असे स्टेट्स ‘मदर्स डे’च्या दिवशी ठेवून आपल्या आईबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तो पाहून दीपा शिपूरकर यांनी तिचे कौतुक केले. तिच्या भावनांना दाद देताच तिचे डोळे पाणावले. त्यानंतर आलेल्या मेसेजने मात्र त्या भावुक झाल्या.
त्या भगिनीने लिहिले होते, ‘तुमच्यामुळे मी तंबाखू खाणं बंद केलं!’ हा मेसेज पाहून शिपूरकर यांना त्यांच्या कामाची खरी पावती मिळाल्याची भावना झाली. त्यांनी तिला अभिनंदन करत उत्तर दिले. त्यावर त्या भगिनीने आणखी एक हृदयस्पर्शी संदेश पाठवला, “तुम्ही फक्त माझ्या मागे राहा... मी प्रत्येक गोष्ट बंद करायला तयार आहे... आणि प्रत्येक तृतीयपंथीयालाही ते बंद करण्यासाठी मदत करीन.” या घटनेमुळे ‘थुंकीमुक्त चळवळ’ ही केवळ स्वच्छतेची मोहीम नसून माणसांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवणारी सामाजिक चळवळ असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले.
बदल एका दिवसात होत नाही; पण प्रेम, सातत्य आणि विश्वासाने माणूस नक्की बदलतो. त्या भगिनीचा मेसेज म्हणजे माझ्यासाठी मोठा पुरस्कार आहे. ‘प्रयत्ने वाळूचे कण रगडीता... तेलही गळे!’ - दीपा शिपूरकर, कोल्हापूर
Web Summary : A transgender woman's message to Deepa Shipurkar, a leader in Kolhapur's spit-free movement, stating she quit tobacco due to Shipurkar's efforts, revitalized the initiative. This highlights the movement's positive impact on lives beyond cleanliness.
Web Summary : कोल्हापुर में थूक-मुक्त आंदोलन की नेता दीपा शिपूरकर को एक ट्रांसजेंडर महिला का संदेश मिला, जिसमें उसने शिपूरकर के प्रयासों से तंबाकू छोड़ने की बात कही। इससे पहल को नई ऊर्जा मिली, जो स्वच्छता से परे जीवन पर सकारात्मक प्रभाव डालती है।