Kolhapur: क्षणिक डुलकी जिवावर उलटली, पहाटे कार ट्रकवर आदळली; एअरबँग उघडूनही दोन ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 12:45 IST2026-01-12T12:44:20+5:302026-01-12T12:45:09+5:30
एसीबीच्या उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या कारला भीषण अपघात, लांबचा प्रवास असल्याने दोन चालक तरीही..

Kolhapur: क्षणिक डुलकी जिवावर उलटली, पहाटे कार ट्रकवर आदळली; एअरबँग उघडूनही दोन ठार
कोल्हापूर : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) उपअधीक्षक वैष्णवी सुरेश पाटील ( वय ४०, रा. कळंबा रोड, कोल्हापूर, मूळ रा.चंद्रे, ता.राधानगरी) यांच्या कारला कर्नाटकातील चित्रदुर्ग ते कलबुर्गी महामार्गावर भीषण अपघात झाला. रविवारी (दि. ११) पहाटे चारच्या सुमारास झालेल्या अपघातात पाटील यांच्या आई कमल हरिभाऊ पाटील (वय ६९, रा. कांदे, ता. शिराळा, जि. सांगली) आणि कार चालक राकेश अर्जुन आयवाळे (३९, रा. निपाणी, जि. बेळगाव) यांचा जागीच मृत्यू झाला.
या अपघातात उपअधीक्षक पाटील यांच्यासह त्यांच्या चुलती कुसुम प्रल्हाद पाटील (५७, रा. कांदे) आणि एसीबीचे कॉन्स्टेबल उदय दत्तात्रय पाटील (रा. कौलव, ता. राधानगरी) हे गंभीर जखमी झाले. रामेश्वर येथील देवदर्शन घेऊन परत येताना चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती चित्रदुर्ग येथील पोलिस उपअधीक्षक दिनकर पी. के. यांनी दिली.
उपअधीक्षक वैष्णवी पाटील या त्यांच्या आई आणि चुलतीला देवदर्शन घडविण्यासाठी स्वत:च्या कारने दक्षिण भारतात गेल्या होत्या. कार्यालयातील कॉन्स्टेबल उदय पाटील यांना सोबत घेऊन त्या गुरुवारी कोल्हापुरातून बाहेर पडल्या होत्या. शनिवारी सायंकाळी रामेश्वर येथील देवदर्शन आटोपून ते परतीच्या मार्गाला लागले. रविवारी पहाटे चारच्या सुमारास कर्नाटकातील चित्रदुर्ग ते कलबुर्गी महामार्गावर तमताकल्लू गावाजवळ चालकाचे नियंत्रण सुटून भरधाव कार समोरच्या ट्रकवर आदळली.
भीषण अपघातात चालक राकेश आयवाळे आणि त्यांच्या शेजारी बसलेल्या कमल पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. मागच्या सीटवर बसलेल्या उपअधीक्षक पाटील यांच्यासह त्यांच्या चुलती आणि कॉन्स्टेबल उदय पाटील जखमी झाले. चित्रदुर्ग पोलिसांनी तातडीने जखमींना चित्रदुर्ग येथील खासगी रुग्णालयात दाखल केले.
अपघाताची माहिती मिळताच पाटील कुटुंबीयांनी चित्रदुर्गकडे धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेऊन जखमींना पुढील उपचारासाठी कोल्हापूरकडे हलवण्यात आले. जखमींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती त्यांच्या नातेवाइकांनी दिली. उपअधीक्षक पाटील यांच्या चेहऱ्यावर दुखापत झाली आहे. रात्रभर कार चालवल्याने पहाटेच्या सुमारास चालकाच्या डोळ्यावर झापड येऊन अपघात झाला असावा, असा प्राथमिक अंदाज चित्रदुर्ग पोलिसांनी वर्तवला आहे.
देवदर्शनासाठी आल्या अन् दुर्घटना घडली
उपअधीक्षक पाटील यांनी आई आणि चुलतीला देवदर्शनासाठी बोलावले होते. आनंदात सर्वजण देवदर्शनासाठी गेले होते. रविवारी सकाळपर्यंत ते कोल्हापुरात पोहोचणार होते. तत्पूर्वीच कोल्हापूरपासून ४०० किलोमीटर अंतरावर झालेल्या अपघाताने दोघांचा बळी घेतला. या अपघातात कारचा अक्षरश: चक्काचूर झाला. विशेष म्हणजे समोरच्या दोन्ही एअरबॅग उघडूनही दोघांचा मृत्यू झाला. त्यावरून अपघाताची भीषणता स्पष्ट होते.
लांबचा प्रवास असल्याने दोन चालक तरीही..
प्रवास लांबचा आहे. चालकाला विश्रांती मिळावी यासाठी उपअधीक्षक पाटील यांनी सोबत दोन चालकांना नेले होते तरीही अपघात चुकला नाही. त्यात एका चालकाचा मृत्यू झाला, तर दुसरा कौलवचा चालक जखमी झाला. क्षणिक डुलकी दोघांच्या जिवावर बेतली तर वैष्णवी पाटील यांच्यासह कारमधील अन्य तिघेजण जखमी झाले.
गाडीचा अक्षरशः चेंदामेंदा
उपअधीक्षक पाटील यांनी आई आणि चुलतीला देवदर्शनासाठी बोलावले होते. आनंदात सर्वजण देवदर्शनासाठी गेले होते. रविवारी सकाळपर्यंत ते कोल्हापुरात पोहोचणार होते. तत्पूर्वीच कोल्हापूरपासून ४०० किलोमीटर अंतरावर झालेल्या अपघाताने दोघांचा बळी घेतला. या अपघातात कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. विशेष म्हणजे समोरच्या दोन्ही एअरबॅग उघडूनही दोघांचा मृत्यू झाला.
यरनाळ गावावर शोककळा
अपघातात जागीच ठार झालेला चालक राकेश अर्जुन ऐवाळे (वय ३९ रा. यरनाळ, ता. निपाणी) हा गेल्या आठ वर्षांपासून उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या कारवर चालक म्हणून काम करत होता. ते चार दिवसापूर्वी वैष्णवी पाटील यांच्या कुटुंबीयांसमवेत देवदर्शनासाठी दक्षिण भारतात गेले होते. परत येताना झालेल्या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन जुळी मुले, आई, वडील, दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे. त्यांचे वडील अर्जुन ऐवाळे हे निवृत्त शिक्षक आहेत. अपघातात आपल्या एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने त्यांना मोठा धक्का बसला.
जखमी वैष्णवी पाटील यांची प्रकृती स्थिर
अपघाताची माहिती मिळताच पाटील कुटुंबीयांनी चित्रदुर्गकडे धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेऊन जखमींना उपचारासाठी कोल्हापूरकडे हलवण्यात आले. जखमींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती त्यांच्या नातेवाइकांनी दिली. उपअधीक्षक पाटील यांच्या चेहऱ्यावर दुखापत झाली असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. रात्रभर कार चालवल्याने पहाटे चालकाच्या डोळ्यावर झापड येऊन अपघात झाला असावा, असा अंदाज चित्रदुर्ग पोलिसांनी वर्तविला आहे.