उल्हासनगरात उद्धवसेनेचे नालेसफाईसाठी आंदोलन; प्रशासनाकडून दाखल घेत नालेसफाईला सुरवात
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2026 17:15 IST2026-05-12T17:14:56+5:302026-05-12T17:15:17+5:30
उल्हासनगरातील नाले कचऱ्याने तुंबल्याचे चित्र सर्वत्र असतांना, महापालिकेने पावसाळ्यापूर्वीच्या नाले सफाईला सुरवात केली नाही.

उल्हासनगरात उद्धवसेनेचे नालेसफाईसाठी आंदोलन; प्रशासनाकडून दाखल घेत नालेसफाईला सुरवात
लोकमत न्यूज नेटवर्क उल्हासनगर : पावसाळा तोंडावर आलेला असतानाही शहरातील नालेसफाईची कामे रखडल्याच्या निषेधार्थ उद्धवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी आक्रमक पवित्रा घेतला. गोल मैदान आणि टेलिफोन एक्सचेंज परिसरातील कचऱ्याने तुंबलेल्या नाल्याजवळ जोरदार आंदोलन केल्यानंतर पालिका प्रशानाने जेसीबी मशीनद्वारे नाल्यातील कचरा काढण्याचे काम सुरू केले.
उल्हासनगरातील नाले कचऱ्याने तुंबल्याचे चित्र सर्वत्र असतांना, महापालिकेने पावसाळ्यापूर्वीच्या नाले सफाईला सुरवात केली नाही. हे हेरून उद्धवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी कचऱ्याने तुंबलेल्या नाल्या शेजारी आंदोलन केले. वेळीच नाले सफाई झाली नाहीतर, शहरात पाणी साचून पूरस्थिती निर्माण होण्याची भीती महानगरप्रमुख दिलीप मिश्रा व शहरप्रमुख प्रशांत धांडे यांनी व्यक्त केली. नाल्यात साचलेल्या पाण्यामुळे डासांची उत्पत्ती वाढून साथीचे आजार पसरण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. मान्सूनपूर्व स्वच्छता तातडीने आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण व्हावी तसेच नेहमी प्रमाणे एकाच ठेकेदाराला नाले सफाईचा ठेका देऊ नये, अशी मागणीही केली.
उद्धवसेनेचे जिल्हाप्रमुख शरद पाटील, उपजिल्हाप्रमुख राजेंद्र साहू, भीमसेन मोरे, महानगरप्रमुख दिलीप मिश्रा, मधुकर साबळे, शहरप्रमुख प्रशांत धांडे, राजन वेलकर, कृष्ण पुजारी यांच्यासह असंख्य पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले होते. आंदोलनकर्त्यांनी महापालिका प्रशासना विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. पालिका प्रशासनाने या आंदोलनाची दखल घेत नाल्यातील कचरा साफ करण्याचे काम सुरू केली आहे.