धावत्या खोपोली लोकल ट्रेनमध्ये चाकूचा थरार, प्रवाशावर हल्ला करून लुटीचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2026 18:40 IST2026-04-27T18:39:22+5:302026-04-27T18:40:06+5:30
व्हिडिओ व्हायरल : सराईत गुन्हेगार अटकेत

धावत्या खोपोली लोकल ट्रेनमध्ये चाकूचा थरार, प्रवाशावर हल्ला करून लुटीचा प्रयत्न
कल्याण : खोपोली लोकल ट्रेनमध्ये विठ्ठलवाडी-उल्हासनगर स्थानका दरम्यान प्रवाशावर चाकू हल्ला करून लुटीचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. २३ फेब्रुवारी रोजी दुपारी घडलेल्या या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रेल्वे सुरक्षा बल आणि रेल्वे पोलिसांनी चाकू हल्ला करणाऱ्या आरोपीला अटक केली आहे.
विठ्ठलवाडी ते उल्हासनगर दरम्यान धावणात्या खोपोली लोकल ट्रेनमध्ये २३ फेब्रुवारी रोजी दुपारी साडे एकच्या सुमारास हा प्रकार घडला. आरोपीने प्रवासी नितेश कुमार शहा यांच्यावर चाकू हल्ला करत लुटीचा प्रयत्न केला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे डब्यात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. या हल्ल्यात नितेश कुमार शहा हे किरकोळ जखमी झाले. ते खेळणी विक्रीचा व्यवसाय करतात. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या प्रकरणाची गंभीर दखल घेत रेल्वे सुरक्षा बल आणि रेल्वे पोलिसांनी आरोपी जोगिंदर सिंग लबाना याला अटक केली. लबाना हा उल्हासनगर परिसरातील सराईत गुन्हेगार असल्याची माहिती समोर आली आहे. आरोपीला कल्याण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
धावत्या लोकलमध्ये घडलेल्या या घटनेमुळे रेल्वे प्रवासातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी अधिक कडक उपाययोजना करण्याची मागणी रेल्वे प्रवासी संघटनेकडून केली जात आहे.